लक्ष्मीची पूजा आपण वर्षभर करतो. कारण तिच्या कृपेशिवाय आपला उदरनिर्वाह अशक्य आहे. सध्याचे जग तर प्रचंड व्यवहारी झाले आहे. इथे प्रत्येक जण लक्ष्मीचा उपासक आहे. असे असताना अश्विन कृष्ण अमावस्येची तिथी लक्ष्मीपूजेसाठी का योजली असावी ते जाणून घेऊ. यंदा १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2024) आहे.
दिवाळी हा हिंदूंचा सण असला, तरी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वांनाच असते. प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तीपूर्वक लक्ष्मीपूजन करतो. व्यापारी मंडळी आजच्या दिवशी पूजेनंतर वर्षभराचा जमा खर्च लिहिण्याची वही पूजेत ठेवतात. त्याला चोपडी पूजन म्हणतात. इतर अमावस्या शुभ कार्यासाठी योग्य मानल्या जात नाहीत, अपवाद असतो लक्ष्मीपूजनाचा! आपल्याही अंधारलेल्या आयुष्यात नवआशेचे, चैतन्याचे दीवे लावावेत व अंधारावर मात करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मीकृपा प्राप्त करावी, हाच संदेश या सणातून मिळतो. आपल्या संपत्तीत भर पडावी म्हणून आणि असलेल्या संपत्तीचा ऱ्हास होऊ नये म्हणून दिलेल्या वास्तु टिप्स फॉलो करा.
घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे लावतो, ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या घरासाठी बाधक असतात. म्हणून घरात सकारात्मक चित्रांबरोबरच वास्तुशास्त्राला अनुकूल ठरतील, अशा चित्रांची निवड करावी.
वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेलही, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार, तर्क आपल्याला नक्कीच करता येईल. म्हणून युद्धाचे, प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं, जंगली श्वापदे यांची चित्र ठेवू नयेत. तसेच निसर्ग चित्रांचीही तार्किक बाजू लक्षात घेऊन निवड करावी. जसे की झरा, धबधबा, समुद्र, नदी हे देखावे निसर्गात जाऊन पाहणे जितके सुखावह ठरतात, तेवढे घरातल्या चार भिंतींच्या तसबिरीत आकर्षक वाटत नाहीत. त्यातही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतात.
१. कारंजे किंवा धबधब्याचे चित्र दिसायला सुंदर असते, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे व्यर्थ कामांमध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहत जातो.
२. जलप्रपात किंवा कारंजेचे चित्र वास्तु शास्त्रज्ञांना विचारल्यानंतरच लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र बर्याचदा वापरले जाते, परंतु अन्य कोठे हे चित्र लावताना सल्ला जरूर घ्यावा.
3. काही लोक मत्स्यालय ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात. परंतु तेही उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नका, तर त्याचे घरावर, आरोग्यावर काय पडसाद पडतील, याची माहिती करून घ्या आणि मगच लावा.