मी म्हणेन तीच पूर्व, हा हेका दरवेळी कामी येत नाही. अनेकदा परिस्थिती जशी दिसते तशी प्रत्यक्षात नसते. म्हणून समोरच्याला दोष देण्याआधी त्याच्या बाजूनेही परिस्थिती समजून घेण्याचा थोडा फार प्रयत्न करा. उद्या पश्चात्तापाची वेळ येण्यापेक्षा, आपणही आपल्या बाजूने समजुतदारी दाखवणे गरजेचे आहे.
एक कामगार आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करत असे. कामाच्या बाबतीत वरिष्ठांना त्याच्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. अतिशय सद्गुणी असा तो कामगार आपल्या कामाबरोबर समाजसेवेतही स्वत:ला झोकून देत असे. कधी कोणाची मदत कर, कोणाला दान कर, कोणाचे सामान आणून दे, अशी मदतस्वरूपी कोणतीही कामे तो आनंदाने करत असे. परंतु, अशा दुनियादारीत त्याला कामावर पोहोचण्यास उशीर होत असे. सहकाऱ्यांना ही गोष्ट खटकत असे. त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली.
कामागाराचे कामातील योगदान पाहता त्यांनी त्याच्या उशिरा येण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु सहकाNयांनी तक्रार केल्यावर त्यांना कामगाराला धाक दाखवावा लागला. कामगाराकडे उशिरा येण्याचे कारण तयार असे. ते ऐकवून तो त्याच्या कामाला लागे.
कंपनीचा नियम सर्वांना सारखा असला पाहिजे, या विचाराने वरिष्ठांनी एकदा कामगाराला जरब बसण्यासाठी शिक्षा सुनावली. तीन दिवस बिनपगारी रजेवर जाण्याची! त्याही दिवशी उशिरा पोहोचलेला कामगार निमूटपणे निघून गेला.
घरी जाण्याआधी त्याला सकाळी अपघातात जखमी झालेला तरुण आठवला. त्याच्या तब्येतीची चौकशी करून मग घरी जावे, अशा बेताने कामगार रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांना भेटला. तरुणाची खुशाली विचारली. तो शुद्धीवर आला होता. त्याने त्याच्या पालकांना बोलावून घेतले होते. कामगार त्या तरुणाशी बोलत असताना त्याच्या पालकांनी पाठमोरा उभ्या असलेल्या कामगाराचे आभार मानले. कामगाराने पाठी वळून पाहिले, तर ते त्याचे कंपनीतले वरिष्ठ, ज्यांनी त्याला शिक्षा सुनावली. याचा अर्थ अपघातात जखमी झालेला मुलगा त्यांचा होता.
कामगाराला पाहून वरिष्ठ खजिल झाले. त्यांनी हात जोडून कामगाराची माफी मागितली. त्यावर कामगार म्हणाला, `तुम्ही तुमच्या जागी योग्य तेच केलेत सर. परंतु, अनेकदा वेळेवर मदत करणेही गरजेचे असते. सध्या लोकांकडे वेळ नाही, म्हणून वाटेत कोणाला मदतीची गरज असेल, तरी ते दुर्लक्ष करून निघून जातात. मला राहवत नाही. म्हणून मी आधी मदत करतो मग कंपनीत येऊन माझे काम पूर्ण करतो आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा वेळेत हजर राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही माझ्या सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून मला शिक्षा केलीत, हरकत नाही. परंतु प्राप्त परिस्थितीचा वेध घेऊन ती शिक्षा केली असतीत, तर तुमच्या नजरेत खजिलपणाचे भाव दिसले नसते...'
म्हणून बोलण्याआधी विचार करा...बोलून झाल्यावर नाही!