भविष्याच्या काळजीने आणि भूतकाळाच्या आठवणीने आपण वर्तमानात जगणे सोडून देतो आणि जे मिळाले आहे त्यात समाधान न मानता, जे मिळाले नाही, त्याबद्दल दु:ख करत बसतो. अशा स्वभावाने आपण आनंदी कधीच राहू शकणार नाही. यासाठी वेळीच बदल करायला हवा. तो कसा? ते या गोष्टीतून शिकुया...
एक बाई तरुण वयात विधवा होते. पतीच्या मृत्यूपश्चात पदरी असलेल्या दोन मुलींचे संगोपन करण्यासाठी अपार कष्ट घेते. मुलींना मोठे करते. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न लावून देते. त्यांचा सुखाचा संसार बघण्यासाठी कधी एका लेकीकडे तर कधी दुसरीकडे आलटून पालटून राहते.
मुलींच्या घरची परिस्थितीही बेताची असते. म्हणून त्यादेखील व्यवसाय करुन संसाराला हातभार लावत असतात. एका मुलीचा व्यवसाय असतो छत्रीचा, तर दुसरीचा वाळवणाचे पदार्थ करण्याचा! त्यांचे घर छान चालावे एवढीच तिची इच्छा होती. परंतु बदलत्या ऋतूमानाचा परिणाम त्या दोघींच्या व्यवसायावर पडत होता. म्हणून त्यांची आई दरदिवशी देवाला दोष देत असे. पाऊस पडला तर छत्री विकणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल आणि कडक ऊन पडले, तर वाळवणे करणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल. तिची ईच्छा पूर्ण करण्यासाठी देव कधी ऊन तर कधी पाऊस पाडत असे. तरी तिचे रडगाणे सुरूच असे.
एक दिवस गावातून जाणाऱ्या एका साधुबाबांनी तिला रडण्याचे कारण विचारले, तर म्हणाली, `देवाने माझ्या वाट्याला कष्ट दिले, मी केले परंतु माझ्या मुलींना तरी सुख द्यायला हवे होते. पण तो मात्र त्यांच्या परिश्रमाच्या आड येत आहे. ऊन आणि पाऊस यांचा समतोल त्याला राखताच येत नाही, मग माझ्या मुलींनी व्यवसाय करायचा तरी कसा?'
यावर साधूबाबा म्हणाले, `ही मनुष्याची असमाधानीवृत्ती आहे. देवदयेने तुझ्या मुलींचा छान संसार सुरू आहे, व्यवसायही ठीक ठाक सुरू आहे, पण तुझ्या अवास्तव मागण्या देव कसा पूर्ण करणार? त्याला एकाच वेळी अनेकांचे पालन पोषण करायचे आहे. तरीदेखील तो आपली काळजी घेत आहे याचे समाधान मानायचे सोडून आपण रडत बसलो, तर कधीच सुखी होऊ शकणार नाही. म्हणून काळजी करणे सोड. ज्याप्रमाणे तू कष्ट करून तुझ्या मुलींच्या आयुष्याचे सोने केलेस, तसे त्याही त्यांचे भविष्य घडवतील. म्हणून काळजी करणे सोड आणि वर्तमानात जगायला शिक, तरच आयुष्याचा आनंद घेऊ शकशील.