ज्योत्स्ना गाडगीळ
तुम्हाला फेंगुशुईचा लाफिंग बुढ्ढा माहितीये का? तोच जो, या कानापासून त्या कानापर्यंत हसताना दिसतो. ती केवळ मूर्ती नाही, तर असेच दिलखुलासपणे जगणारे लोक आपल्या सभोवताली आहेत. त्यांना पाहता आपल्याला त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे की काय, असा प्रश्न पडतो. परंतु, समोरच्याच्या मनात हा संभ्रम निर्माण होण्याची स्थिती तयार करणे, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. सुख, दु:ख, उद्विग्न, चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात. परंतु, कोणी त्याचा फार विचार करतात, तर कोणी दुर्लक्ष! म्हणून लाफिंग बुढ्ढा हा आपला आदर्श हवा. आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही.
हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...
एका साधूंच्या आश्रमात एक युवक संन्यस्त जीवनाची दीक्षा घेण्यासाठी आला. साधूंच्या सभेत त्याने आपल्या गतकाळातील चुकांची कबुली दिली. साधू आपल्याला चुकांचे प्रायश्चित्त सुचवतील असे त्याला वाटले. परंतु झाले उलटेच. सगळे साधू त्याच्या चुका ऐकून हसू लागले. युवक खजिल झाला. त्यानंतर बराच काळ लोटला. परंतु, सगळे आपल्याला हसले, ही खंत मनातून जात नव्हती. एकदा धीर करून त्याऐकून ने आपल्या गुरुंना विचारले. `त्यादिवशी माझ्या चुकांची कबुली ऐकून सगळे मला का हसले?'
त्यावर गुरुजी उत्तरले, `बाळा, हीच सन्यस्त जीवनाची पहिली दिक्षा आहे. दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्याआधी आपल्या चुकांवर हसायला शिका, म्हणजे आपल्या चुकांवर कोणी हसले, याचा राग येणार नाही. संन्याशाला राग, लोभ शोभत नाही. सामान्य मनुष्यालाही या गोष्टींचा त्याग करायचा असेल, तर त्यानेही आधी गत चुकांकडे एक अपघात म्हणून पाहिले पाहिजे आणि भूतकाळ विसरून पुढे गेले पाहिजे. तरच, भविष्य घडवता येईल. भूतकाळात अडकलेले लोक वर्तमान आणि भविष्य दोन्हीही गमावतात. म्हणून हसा आणि आयुष्य सहजतेने बघायला शिका.'
या कथेतून पुन्हा डोळ्यासमोर येतो, तो लाफिंग बुढ्ढा! ज्याचे दोन्ही हात वर, ढेरपोटे पोट, तुळतुळीत टक्कल आणि मनमोकळे हास्य आपल्याला हसायला आणि आपले प्रश्न विसरायला भाग पाडते.
आपण आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो, तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का? आपण नुसता विचार करत राहतो, त्याने खरंच काही बदल घडणार आहे का? भूतकाळ निसटून गेला आहे, त्यातल्या वाईट आठवणी उगाळून हाती काही लागणार आहे? मग का आपण स्वत:ला त्रास करून घेत आहोत? ज्या गोष्टी बदलणार नाहीत, त्यांचा विचार न करता, ज्या गोष्टी आपण बदलवू शकू, त्याचा विचार केला, तर आयुष्य आपोआपच लाफिंग बुढ्ढासारखे आनंदी होईल.
चुका प्रत्येकाकडून घडतात आणि त्या घडायलाही हव्यात. त्याशिवाय आपण शिकणारच नाही. दर वेळी वेगवेगळ्या चुका घडल्या तरी चालेल, पण एकच चूक वारंवार न होत नाहीये ना, हे लक्षात घेतले पाहिजे. वर्तमानात हव्या तेवढ्या चुका होऊदेत, त्यातून शिकत आपल्याला भविष्य घडवायचे आहे आणि भविष्यात भूतकाळातील आपल्याच चुका आठवून हसायचे आहे, अगदी लाफिंग बुढ्ढासारखे!