१३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र आजही आपल्याकडे डावखुऱ्या लोकांना सक्तीने उजव्या हाताचा वापर करायला सांगितला जातो. कारण देवकार्यात डावखुऱ्या लोकांना प्रवेश नाही हा गैरसमज समाजात रूढ झाला आहे. मात्र धर्मशास्त्रात याबद्दल कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाची नैसर्गिक रचना अबाधित ठेवून त्यांचा स्वीकार करावा यासाठी आजच्या औचित्याने सदर लेख पुनःप्रकाशित करत आहोत.
डावखुरेपणा हा काही आजार नाही, तर तो नैसर्गिक सवयीचा भाग आहे. परंतु, विशेषतः धर्म कार्यात एखाद्या डावखुऱ्या व्यक्तीने कामात पुढाकार घेतला, की त्याला अकारण हटकले जाते. ही बाब शास्त्राला धरून आहे की लोकांनी निषिद्ध ठरवली आहे, ते जाणून घेऊया.
डावखुरेपणाबद्दल शास्त्रात कुठेही आक्षेप घेतलेला नाही. कारण ती अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु, धर्म कार्यात फुलं वाहताना, पूजा करताना, आचमन घेताना किंवा प्रसाद घेताना उजव्या हाताचा उल्लेख आवर्जून केल्याचे आढळून येते. त्याचे स्पष्टीकरण कुठेही दिलेले नसले, तरी त्यामागील साधा तर्क असा काढता येतो, की जगातील लोकसंख्येच्या १० टक्के लोक डावखुरे असतात. शास्त्राची रचना सर्वसाधारणपणे सर्वांना लागू होईल अशा पद्धतीने केलेली असते. त्यानुसार ९० टक्के लोकांचा विचार करता शास्त्रात उजव्या हाताला प्राधान्य दिले असावे, हा प्राथमिक विचार लक्षात येतो. पण म्हणून, डावखुऱ्या लोकांना गटातून बाहेर काढण्याचे काहीच कारण नाही.
योगशास्त्राने याबाबत अधिक खुलासा केला आहे, की आपले हृदय शरीराच्या डाव्या बाजूला स्थित असते. त्यावर फार भार पडू नये, म्हणून डाव्या हातावर कामाचा भार कमी टाकला जातो. जड, अवघड कामे उजव्या हाताने उरकली जातात. हिंदीत एक प्रचलित म्हण आहे, 'ये तो मेरे बाए हाथ का खेल है' म्हणजेच हे सहज होणारे काम आहे. यावरूनही लक्षात येते, की डाव्या हातावर आपण सहजगत्या होणाऱ्या कामाची जबाबदारी टाकतो.
परंतु जे डावखुरे लोक असतात, त्यांचा निसर्गतः डावा हात अधिक कार्यशील असल्यामुळे साहजिकच त्यांच्या हृदयावर थोडा ताण पडतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की डावखुरे लोक उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत सरासरी ७ वर्षे कमी जगतात. मात्र काही डावखुरे लोक दोन्ही हातांचा छान समतोल साधतात. डाव्या आणि उजव्या हाताने व्यवस्थित काम करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिक कार्यन्वित होतो आणि हे लोक अधिक क्रियाशील आणि सक्षम बनतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील दोन्ही हातांनी सहजपणे काम करू शकतात. तर अमिताभ बच्चन, ओबामा, राफेल नदाल, आइनस्टाइन, नेपोलियन आणि हिलरी फोर्ड ही काही डावखुऱ्या लोकांची यादी पाहिली, तर आपणही वरील विधानाशी सहमत व्हाल. यासाठीच डावखुऱ्या मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याकडून दोन्ही हातांनी जास्तीत जास्त सराव करण्याची सूचना दिली जाते.
धर्माने किंवा शास्त्राने हातांमध्ये भेदाभेद केला नाही. उलट हात जोडताना, अर्घ्य देताना, दान करताना दोन्ही हात जुळून पुढे येतात तेव्हाच कार्याला गती येते. म्हणून व्यक्तीत डावे उजवे न करता सर्वांना सामावून घ्यावे आणि समारंभाचा आनंद दोन्ही हातांच्या ओंजळीने भरभरून घ्यावा आणि द्यावा.