एकदा एक वाघीण शिकारीला गेली. तिथे तिला लांडग्यांचा कळप दिसला. त्यातल्या एका लांडग्यावर झडप टाकून तिने त्याची शिकार केली. पण त्याच वेळेस तिचे पिल्लू दृष्टीआड झाले. ते लांडग्यांच्या कळपात गुडूप झाले आणि पुढे काही काळ त्यांच्यात राहू लागले. लांडग्यांनी त्याला त्रास दिला नाही, उलट त्याचा सांभाळ केला. त्यांच्यात राहून वाघिणीचे बछडे स्वतःला लांडगा समजू लागले. ते मोठे होत गेले. शरीर वाघाचे पण वृत्ती लांडग्यांची!
एक दिवस आणखी एका वाघाने त्या लांडग्यांच्या कळपावर हल्ला केला आणि त्यात त्याला हा तरुण वाघ दिसला. परंतु तोही जीव मुठीत घेऊन पळत होता. वाघाने बाकी लांडगे सोडून त्या वाघाला पकडले. तो वाघ गयावया करू लागला. त्यावेळेस शिकार करणाऱ्या वाघाने तरुण वाघाला नदीपाशी नेले आणि त्या पाण्यात प्रतिबिंब दाखवत म्हटले, तू कोण आहेस हे ओळख. लांडगा नाही तर तू वाघ आहेस वाघ! एकदा मोठ्य्याने डरकाळी दे, म्हणजे तुला तुझी खरी ओळख पटेल. असे म्हणत शिकारी वाघाने मोठी डरकाळी फोडली. ते पाहून तरुण वाघाने एक दोनदा घाबरत घाबरत डरकाळी फोडली. तिसऱ्यांदा मात्र त्याने जी गर्जना केली, तेव्हा त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. इतके दिवस आपण ज्यांच्या संपर्कात राहत होतो, त्याच्यात राहून माझी मनोवृत्ती सुद्धा तशीच घडली. माझे व्यक्तिमत्त्व तसे घडले. परंतु, ही माझी खरी ओळख नाही, हे जाणून घेत वाघाने शिकारी वाघाचे आभार मानले आणि नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली.
म्हणूनच आपले ज्येष्ठ, गुरुजन, मार्गदर्शक आपल्यला नेहमी सुसंगतीत राहा असे सांगतात. तुमच्या बाजूला नकारात्मक विचारांचे, द्वेष, मत्सर, कोत्या विचारांचे लांडगे असले, तर आपल्याला वाघासारखी डरकाळी फोडून आपल्या शक्तीची कल्पनाच येणार नाही. म्हणून गर्दीमागे धावू नका. गर्दीची दिशा योग्य असेलच असे नाही. सारासार विचार करा आणि जे तुमच्या बुद्धीला पटेल, मनाला पटेल आणि शक्तीला झेपेल तेच करा आणि स्वतःची ओळख बनवा!