एखाद्याचे मोठेपण लक्षात येताच, लोक त्याचे अनुकरण करायचे सोडून त्याला देव्हाऱ्यात नेऊन बसवतात. मग त्या व्यक्तीने चुकूनही चूक करणे, समाजाला अपेक्षित नसते. परंतु, माणसाचे मोठेपण हे त्याच्या कर्तृत्वात असते. कर्तृत्वाला मोठेपणा न देता, माणसांना मोठेपणा दिल्यामुळे संबंधित व्यक्तीला सामान्य आयुष्य जगणेही कठीण होऊन बसते. हीच व्यथा तुकाराम महाराजांनी एका अभंगातून व्यक्त केली आह़े
कलियुगी कवित्व करिती पाखांड, कुशल हे भांड बहू झाले।कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी, आपण भिकारी अर्थ नेणे।न कळे ते मज पुसती छळूनी, लागता चरणी न सोडिती।तुझ्या पायाविण दुजे नेणे काही, तू चि सर्वाठायी एक मज।तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकांशी।
तुकाराम महाराजांनी इथे त्यांच्या आसपासच्या लोकांचा त्यांना कसा त्रास होत होता आणि भांडखोर माणसे नाना प्रकारे पाखंडी मतांचे प्रतिपादन करून अधम जातीचे काव्य कशी करीत होती, त्यांचे वर्णन करीत आहेत. त्यांच्याबद्दल एक त्यांनी दृष्टांत दिला आहे. कांद्याची आवड असणाऱ्या माणसाला कस्तुरीच्या वासाची काही किंमत जशी वाटत नाही, तशी या पाखंडी कवींना खऱ्या आत्मानुभूतीची मातब्बरी वाटत नाही.
महाराजांना ते लोक ऐहिक शास्त्रातील नाना प्रश्न व आपल्या सांसारिक अडचणी सांगत होते आणि त्यांचे पाय घट्ट धरून हट्टाने काहीतरी उपाय सांगा असे म्हणत होते. विठ्ठलाजवळ मग महाराज गाऱ्हाणे सांगतात, की देवा मला तुझ्या चरणांच्या सेवेशिवाय आणखी काही नारी रे कळत! मला तूच सगळीकडे दिसतोस आणि मला या भंडावून सोडणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत. तू आता असे काहीतरी कर, की हे लोक मला वारंवार प्रश्न विचारून भंडावून सोडणार नाहीत. त्यांची बोलणी बंद कर. मी या वादविवाद करणाऱ्यांशी किती बरे भांडू?
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, असे म्हणतात. आपल्याला दिसते, ती केवळ प्रसिद्धी, पैसा, यश. परंतु, तो एक काटेरी मुकुट असतो. तो मुकुट घालणाऱ्यालाच त्याची व्यथा माहित असते. म्हणून यशस्वी व्यक्तींचे केवळ यश न पाहता त्यांचा यशाकडे नेणारा प्रवास पाहावा. जितका साधेपणा अंगी बाणता येईल, यासाठी प्रयत्न करावा. अध्यात्म मार्गातही असे अनुभव येतात. बहुतेक भक्तांना लोकांकडून - आर्त व पीडित लोकांकडून अस त्रास होतो. यासाठी खरे भक्त आपली भक्तीसाधना लोकांच्या लक्षात येणार नाहीत असे वागतात.
हेही वाचा : देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.