एकदा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्या हाती महात्मा गांधींचे एक इंग्रजी पुस्तक लागले. ते पुस्तक एका परदेशी लेखकाने लिहिले होते आणि मुखपृष्ठदेखील त्यांच्याच कल्पनेतून साकारले होते. मुखपृष्ठावर गांधीजींचा फक्त चेहरा होता, तोही पूर्ण नाही, तर कडेकडेचा हिस्सा कापला गेलेला. एवढे मोठे लेखक, भूलचुकीने असे मुखपृष्ठ नक्कीच छापणार नाहीत. यामागे नक्कीच काहितरी विचार असावा. त्या विचारावर बराच काळ विचार केल्यावर आणि पुस्तकातील संपूर्ण मजकूर वाचून झाल्यावर राज ठाकरे यांना लेखकाची संकल्पना लक्षात आली, की गांधीजींचे चरित्र 'चौकटीत' मावणारे नाही, त्याला अनुसरून लेखकाने मुखपृष्ठसजावट केली होती.
महात्मा गांधी, हे खरोखरीच चौकटीत न मावणारे, किंबहुना वैचारिक चौकट मोडणारे व्यक्तीमत्त्व होते. 'अहिंसा परमो धर्म:' ही शिकवण देत त्यांनी समस्त भारतीयांना आपलेसे करून घेतले. म्हणून जनतेने त्यांना आत्मियतेने 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना ते प्रेमाने वागवत असत. ही चांगल्या आचरणाची आणि शुद्ध विचारसरणीची शिकवण त्यांना संत नरसी मेहता यांच्या `वैष्णव जन' या भजनातून मिळाली होती. ते भजन गांधीजींना एवढे आवडत असे, की त्यांनी आपल्या नित्य प्रार्थनेत या भजनाचा समावेश केला होता. गांधी जयंती निमित्त आपणही त्यांच्या आवडीच्या भजनाची उजळणी करूया आणि महात्मा गांधींचे व पर्यायाने संत नरसी मेहतांचे उदात्त विचार अनुसरण्याचा प्रयत्न करूया.
वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे,पर दु:खे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ।
वैष्णव कोणाला म्हणावे, जे दुसऱ्यांचे दु:ख समजून घेतात आणि दुसऱ्यांच्या दु:खाने दु:खी होतात. एवढेच नाही, तर एखाद्याच्या कठीण प्रसंगी जे मदतीचा हात पुढे करतात, परंतु केलेल्या कार्याचा अभिमान बाळगत नाहीत.
सकल लोकमां सहुने वंदे निंदा न करे केनी रे,वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे ।
वैष्णव म्हणजे अशी व्यक्ती, जी नम्र राहून, सर्वांचा आदर करते. कोणाचीही निंदा करत नाही. ज्यांच्या वागण्या-बोलण्यात एकवाक्यता असते आणि कठीण प्रसंगातही जी निश्चल राहते.
समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे,जिव्हा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ।।
सर्वांकडे समदृष्टीने पाहणारी व्यक्ती विरळाच. परंतु, अशी व्यक्तीच सर्वांना समान न्यायाने वागवू शकते. लिंग, जाती, वर्ण, रंग, क्षेत्र, भाषा अशा कोणत्याही बाबींमध्ये भेदभाव करत नाही. परस्त्रीला मातेसमान वागवतो. दुसऱ्यांची संपत्ती पाहून ज्यांच्या मनात लालसा निर्माण होत नाही आणि जे सत्याची कास कधीच सोडत नाहीत, त्यांना वैष्णव जन म्हणावे.
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे,रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे।
मोह-मायेत अडकलेली व्यक्ती दुसऱ्याच्या सुख-दु:खाचा विचार करू शकत नाही. त्यासाठी शरीराने नाही, तर मनाने वैराग्य स्वीकारले पाहिजे. तरच, मोह-मायेत अशा व्यक्तीचा पाय अडकणार नाही. रामनाम आणि रामकाम हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय असते. अशी व्यक्ती जिथे जाते, त्या ठिकाणालाच तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.
वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवार्या रे,भणे नरसैयो तेनु दरसन करतां, कुल एकोतेर तार्या रे।
भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी म्हटले आहे, इच्छेतून लोभ निर्माण होतो, लोभातून मत्सर, मत्सरतेतून क्रोध आणि क्रोधातून सर्वनाश. मात्र, जे वैष्णवपंथी असतात, त्यांच्या मनात कोणाबद्दलही राग, असूया, द्वेष नसतो. उलट दुसऱ्यांच्या मनातील राग, द्वेष, मत्सर अशा भावनांचा ते निचरा करतात. अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ, मात्र ती सापडली, तर तिच्यासमोर नतमस्तक व्हायला विसरू नका आणि तिच्यासारखे बनण्याचा प्रयत्न जरूर करा.