मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण, या महिन्यावर भगवान विष्णू यांचे अधिपत्य असते. त्यामुळे जिथे जिथे विष्णूंचे, कृष्णाचे मंदिर असते, तिथे तिथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. पुरीचे जगन्नाथ मंदिरही त्यापैकी एक. ओरिसा राज्यातील समुद्रतीरी बांधण्यात आलेल्या मंदिरातील श्रीकृष्णाच्या काष्ठमूर्तीला जगन्नाथ नावाने संबोधण्यात येते. या मंदिरात जगन्नाथाच्या मूर्तीबरोबर सुभद्रा आणि बलराम यांच्याही मूर्ती आहेत. आषाढ शुद्ध द्वितीया या दिवशी रथामध्ये या मूर्ती ठेवून रथयात्रा काढली जाते. या उत्सवात लाखो भाविक रथ ओढतात.
सध्याचे जगन्नाथचे मंदिर १२ व्या शतकात बांधले असावे. लाकडाच्या ओबडधोबड मूर्तींना हातपाय नाहीत. फक्त डोळे, नाक व तोंड हे अवयव आहेत. याबाबतीत एक परंपरागत कथा आहे ती अशी-
प्राचीन काळी पुरी नगरीमध्ये इंद्रद्युम्न राजा राज्य करीत होता. त्याने आपल्या नगरात देवमंदिर बांधले, पण त्या स्थापन करण्यासाठी इंद्रनील मण्याची सुंदर मूर्ती हवी होती. मोठ्या कष्टाने त्याने त्या मूर्तीचा शोध लावला. एक शबदर नित्य तिथे जाऊन तिची पूजा करत होता. राजाने एक सैन्यतुकडी मूर्ती आणण्यास पाठवली. पण मूर्ती तिथून अदृश्य झाली. त्याच रात्री स्वप्नात येऊन नीलमाधवाने राजाला म्हटले, `हे राजा, तू अहंकाराने माझा भक्त शबदर याच्याकडून मला छिनावून आणणार होतास म्हणून मी अदृष्य झालो. आता मी तुझ्या राज्यात चंदनी ओंडक्याच्या रूपाने प्रगट होईन. त्या ओंडक्यावर पद्म आणि चक्र ही चिन्हे दिसली की, तीच माझी मूर्ती आहे असे समज.
तसा ओंडका सापडला. पण त्याच्यावर सुताराची हत्यारे चालेनात. अनंत नावाच्या एका म्हाताऱ्या मूर्तीकाराने राजाला सांगितले, देवळाच्या गाभाऱ्यात मला एकवीस दिवस एकटा कोंडून ठेव आणि देवळाचे सर्व दरवाजे बंद कर. या मुदतीत मी या ओंडक्याची मूर्ती घडवीन. एकवीस दिवसांनी तू गाभाऱ्याचा दरवाजा उघड. राजाने मान्य केले. तरीपणे संशयशिच्चाने ग्रस्त होऊण आणि राणीच्या आग्रहामुळे मुदतीच्या आधीच दार त्याने उघडले. तर त्याला हातपाय नसलेला डोळे वटारलेला मुखवटा दिसला. मूर्तीकार मात्र अदृश्य झाला. तेव्हापासून अशाच रुपाच्या मूर्तीची रथयात्रा काढली जाते.
आषाढ शुद्ध द्वितीयेपासून आठ दिवस हा उत्सव चालतो. सर्व भारतातून लाखो भाविक जगन्नाथाचा रथ आपल्या हातांनी ओढण्यासाठी येतात. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिन्ही मुर्तींसाठी तीन मोठे रथ दरवर्षी बनवतात. मंदिराच्या सिंहद्वारापासून रथयात्रा निघते आणि जनकापुरापर्यंत जाते. येथे जगन्नाथाला भेटण्यासाठी लक्ष्मी येते अशी भाविकांची समजूत आहे. अधिक मासात, मार्गशीर्ष मासात देखील भाविक मोठ्या संख्येने जगन्नाथाच्या दर्शनाला जातात.