आपण कितीही सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या मार्गात आडवे जाण्यात लोकांना काय रस असतो ते माहित नाही. परंतु, लोकांच्या त्रास देण्याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि त्याचा परिणाम कळत नकळत आपल्या आयुष्यावर होतो. त्रासलेले आपण दुसऱ्यांना त्रास देऊ लागतो आणि वाईट आचार-विचारांची श्रुंखलाच तयार होत जाते. वाईट वृत्तीच्या माणसांपासून स्वत:ला दूर ठेवावे म्हटले, तर ते सगळीकडेच असतात. अगदी आपल्या घरात, कुटुंबातही! त्यांना तोडून चालत नाही आणि स्वत: तुटून चालत नाही. यावर उपाय काय?
ऑफिसच्या राजकारणाला, जाचाला, कुरबुरींना कंटाळलेला एक कर्मचारी वंâपनीच्या व्यवस्थापकांकडे राजीनाम्याचा अर्ज देतो. त्यांनी तो मान्य करून आपली सुटका करावी, असे कर्मचार विनवतो. व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्याला राजीनामा देण्याचे कारण विचारतात. तो त्याला होणाऱ्या त्रासाची यादीच सादर करतो. व्यवस्थापक सर्व काही शांतपणे ऐकून घेतात व उपाय सांगतात, `राजीनामा देण्याआधी तुमच्यासमोर ठेवलेला, काठोकाठ पाण्याने भरलेला पेला घेऊन तुम्ही आपल्या ऑफिसच्या संपूर्ण आवारात तीन फेऱ्या मारा. फक्त पेल्यातून पाण्याचा एक थेंबही सांडणार नाही याची काळजी घ्या. नंतर मला येऊन भेटा, मी तुमचा राजीनामा मंजूर करतो.'
राजीनामा आणि ऑफिस प्रदक्षिणा यांचा परस्परसंबंध काहीही नसताना कर्मचाऱ्याने त्यांचे ऐकायचे ठरवले आणि पाण्याचा पेला घेऊन तो ऑफिस प्रदक्षिणा मारायला निघाला.
तीन फेऱ्या कशाबशा पूर्ण करून तो व्यवस्थापकांना येऊन भेटला. तिथे आल्यावर व्यवस्थापकांनी विचारले, `आता मला सांगा, तुम्ही तीन फेऱ्या मारताना तुम्हाला कोणी वाईट बोलताना, तुमच्याबद्दल कुरबुरी करताना, राजकारण करताना, कुरघोडी करताना विंâवा एक दुसऱ्याला त्रास देताना आढळले का?'यावर कर्मचाऱ्याने नकारार्थी मान डोलावली.
व्यवस्थापक म्हणाले, `याचा अर्थ ऑफिसमध्ये या गोष्टी घडतच नव्हत्या असे नाही. परंतु, तुमचे लक्ष पाणी सांडणार नाही, याकडे होते. त्यामुळे बाकीच्या गोष्टी वाईट घडूनही तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही. हेच मला तुम्हाला सांगायचे, समजवायचे होते. वाईट वृत्तीचे लोक सगळीकडे असतात. परंतु तुम्हाला तुमच्या पाण्याच्या पेल्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तसे केले, तरच तुमचा निभाव लागू शकेल. अन्यथा जिथे जाल, तिथून तुम्हाल पळच काढावा लागेल. म्हणून दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर लक्ष केंद्रित करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका. तरच तुमचा निभाव लागू शकेल.'
म्हणून पुढच्या वेळी तुमच्या वाट्याला वाईट लोक आले, तरी तुमचे लक्ष पाण्याच्या पेल्यावर केंद्रित करा...!