सद्गुरु साईनाथ महाराजांनी भक्तगणांना 'श्रद्धा आणि सबुरी'चा मंत्र दिला. हा मंत्र साधा-सोपा वाटत असला, तरी आचरणात आणणे कठीण आहे. कारण, सद्यस्थितीत आपल्याला सवय लागली आहे, ती इन्स्टंटची! जेवणसुद्धा २ मिनीटात हवे असते. दोन मिनीटात शिजवलेले अन्न दोन दिवस जिरत नाही, मात्र तरीही आपली पसंती इन्स्टंट फूडला असते. त्याचे कारण म्हणजे, सबुरीची कमतरता आणि जी गोष्ट आपल्या अपेक्षित वेळात अपेक्षेप्रमाणे फलदायी ठरत नाही, त्यावर आपली श्रद्धाही बसत नाही. म्हणून साईनाथ महाराजांनी सबुरी आणि श्रद्धा म्हटले नाही, तर श्रद्धा आणि सबुरी म्हटले आहे. कारण, श्रद्धा असेल, तर सबुरी निर्माण होणार.
सर्दी, खोकला, तापावर औषध देताना डॉक्टर सुरुवातीला दोन दिवसाची औषधे देतात. ती नीट घेतली, तर गुण येईल असे सांगतात. त्यावर विश्वास ठेवून आपण ती श्रद्धापूर्वक घेतो. दोन दिवसांचा संयम बाळगतो. औषधाला गुण येतो आणि आपल्याला बरे वाटू लागते. कारण, त्यावेळेस आपण डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून औषध घेतो आणि सबुरी बाळगल्यामुळे औषधाला गुण येतो. ही झाली दैनंदिन बाब. परमार्थात काही साध्य करायचे, तर दोन्ही गोष्टींची क्षमता साधकाजवळ असावी लागते. थोड्याशा साधनेने भगवंत भेटत नसला, तरी साधनेचे फळ मिळू लागते. हेच सांगणारी एक कथा.
एकदा एक नातू आपल्या आजोबांना विचारतो, आजोबा.. तुम्ही वाचता तशी भगवत गीता मी पण वाचतो, तुम्ही वाचता त्याच लयीत वाचतो, तुम्ही वाचता तितकाच वेळ वाचतो. तरी सुद्धा माझ्या लक्षात काहीच राहात नाही. मग वाचून काय उपयोग. आजोबा म्हणतात, बाळा.. त्या कोपऱ्यात आपली कोळश्याची टोपली ठेवली आहे, ती आणतोस का. नातू टोपली आणून देतो. आजोबा सांगतात, बाळा जरा नदीवर जाऊन ह्या टोपलीत पाणी भरून आण. नातू जातो, नदीत टोपली बुडवतो, टोपली पाण्याने भरते तशी तो घेऊन निघतो. आजोबांना टोपली देतो, आजोबा विचारतात, पाणी कुठे ? आजोबा पाणी गळून गेलं. आजोबा म्हणतात, जा परत जा आणि पाणी घेऊन ये. नातू परत जातो, पाणी भरतो घेऊन येतो. पाणी कुठे गळून गेलं. परत जा आणि पाणी घेऊन ये. परत तेच, पाणी गळून गेलं. आजोबा म्हणतात बाळा.. तू काही तरी चूक करत असशील, चल मी येतो आणि बघतो तू कसं पाणी भरतोस टोपलीत. आजोबा नातवाबरोवर नदी वर जातात, नातू टोपली नदीत बुडवतो, पाणी भरलं की बाहेर काढतो... पाणी गळुन जात.
आजोबा म्हणतात, बाळा टोपलीत वारंवार पाणी भरत आहेस आणि ते गळून जात आहे. पण हे करताना तुझ्या हे लक्षात आले का. आपली कोळश्याने काळीकुट्ट झालेली टोपली आता किती स्वच्छ झाली आहे, अगदी नव्यासारखी. अगदी तसेच, तू भगवद्गीता वाचतोस पण लक्षात राहात नाही, तरी वाचत राहा, वाचत राहा. हे तर तुझे स्वच्छ होणं सुरू आहे. आधीची सगळे दुष्कृत्ये नष्ट होणं सुरू आहे. एक दिवस तू सुद्धा ह्या टोपली सारखा स्वच्छ होशील आणि मग भगवत गीता तुझ्या आचरणात येईल.