एक राजा रोज आपल्या राज्यातून फेरफटका मारायचा. त्याची नजर एका साधू बाबावर पडायची. तो साधू बाबा नेहमी आनंदी असायचा. नाच, गाणं, बासरी वाजवणं, देवाचं भजन म्हणणं, राहत्या जागेची स्वच्छता करणं, सगळ्या कामात तो रंगून जायचा. त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य कधी बघितलंच नाही. म्हणून एक दिवस राजाने त्याच्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायचं ठरवलं आणि त्या साधू बाबांना आपल्या महालात येण्याची विनंती केली.
साधू बाबा एका क्षणात हो म्हणाले. राजासाठी हे अनपेक्षित होतं. त्याला वाटलं, साधू बाबांना आग्रह करावा लागेल, ते नाही म्हणतील, तरी मी मनधरणी करेन, शेवटी ते हो म्हणतील, पण असं काही न होता हे लगेच हो म्हणाले, याचा अर्थ माझं यांच्यावर लक्ष आहे हे ते जाणून असावेत.
राजाचं मन थोडंसं कलुषित झालं. पण आता आपणहून बोलावलं आहे तर न्यावं लागणारच! म्हणून राजाने आपल्या रथात त्यांना बसवलं आणि स्वतः पायी चालू लागला. साधू बाबा आपल्या आनंदात होते. रथात बसलोय म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर अधिक समाधान वगैरे दिसले नाही, पण ते नेहमीसारखे स्वतः मध्ये रंगले होते.
राजाच्या दरबारात साधू बाबांचा पाहुणचार सुरु झाला. सुका मेवा, उंची वस्त्र, दास, दासी सगळ्या गोष्टींचा ते यथेच्छ उपभोग घेत होते. ते पाहून राजाचा राग वाढत होता. सहा महिने झाल्यावर राजा म्हणाला साधू महाराज तुमच्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. झोपडीत असो वा राज महालात तुम्ही एकसारखे आनंदी कसे राहता? तुमची सुखाची व्याख्या काय? मलाही सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
साधू बाबा म्हणाले, आता फार रात्र झाली, उद्या सकाळी सांगतो. त्या उत्सुकतेपोटी राजाला रात्रभर झोप लागेना. जेमतेम सकाळ झाली. राजा साधू बाबांच्या दालनात गेला. साधू बाबांनी उंची वस्त्र काढून आपली फाटकी वस्त्र परिधान केली आणि राजाला म्हणाला वाटेने जाता जाता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. राजा नाईलाजाने त्याच्या बरोबर चालू लागला. बराच पुढे आल्यावर राजा दमला आणि म्हणाला, साधू बाबा, माझ्याने आणखी चालवत नाही, आता इथेच उत्तर द्या!
साधू बाबा म्हणाले, तुला हो म्हटलं त्या दिवशीच तुझ्या डोळ्यातली असूया मला जाणवली. साधू असून महालात राहायला हो म्हटल्यावर तुला माझ्याबद्दल असलेला आदर कमी झाला हे माझ्या लक्षात आलं. सुखाची व्याख्या विचार होतास ना? आज, आत्ता हा क्षण आनंदाने जगणं म्हणजे सुख आहे. पुढचा क्षण कसा असेल, असेल की नसेल हेही आपल्या हातात नसताना उगीच चिंता करण्यात आयुष्य वाया न घालवणं हे माझं तत्त्व आहे. तू तुझ्या संसारात, राज्यात अडकलेला आहेस, त्यामुळे तुला माझा चिरंतन आनंद कशात आहे, हे जाणून घ्यायला सहा महिने घालवावे लागले. इथून पुढे लक्षात ठेव, जर आता श्वास घेतलेला क्षण आनंदाने जगायला शिकलास तर आणि तरच सुखी राहशील आणि सदैव आनंदी राहशील हे लक्षात ठेव!