बालपणी शाळेमुळे का होईना आपल्या सर्वांचेच पाढे पाठ असत. तरीदेखील १३,१७,२३,२९ या विषम आकड्यांची आणि त्यांच्या पाढ्यांची दहशत कायम असे. कॅल्क्युलेटर आल्याने बेरीज वजाबाकी सोपी झाली. पाढे म्हणण्याचा सराव सुटला, तरीदेखील १० पर्यंतचे पाढे आजही तोंडपाठ असतील हे नक्की! अशाच पाढ्यांपैकी ७ च्या पाढ्याचे महत्त्व व्हाट्स अँप युनिव्हर्सिटीत वाचायला मिळाले. त्यानिमित्ताने पाढ्याची उजळणी आणि त्याच्याशी जोडलेला तर्क समजून घेऊ.
याठिकाणी ७ च्या पाढ्याच्या मदतीने आपल्या आयुष्याचा जीवनपट उलगडून सांगितला आहे. तो पुढीलप्रमाणे-
७*१ = ७ बालपण ७*२ = १४ वयात येण्यास सुरुवात ७*३ = २१ लग्नाचं वय ७*४ = २८ मुलं बाळं ७*५ = ३५ सुखी संसार ७*६ = ४२ सांसारिक सुख ७*८ = ५६ सेवा निवृत्तीचे वय ७*९ = ६३ साठीचे कार्यक्रम ७*१० = ७० जगाला निरोप द्यायची मनाची तयारी
बालपणी हा पाढा म्हणत असताना आपण एवढा विचारही केला नसेल. मात्र वेळ गेलेली नाही. जेवढे टप्पे होऊन गेले ते सोडून द्यायचे आणि पुढच्या टप्प्यावर आयुष्याचे कोणते ध्येय गाठायचे आहे त्याचा विचार आणि कृती करायला हवी. वेळेत घडत गेलेल्या गोष्टी जीवनाला आकार देतात. ठरवलेली कामं वेळेत हातावेगळी झाली तर नवीन आव्हानं स्वीकारता येतात.