'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' समर्थ रामदास स्वामींनी सूक्ष्म समाजनिरीक्षणातून हे अनमोल वचन मांडले आहे. या जगात पूर्णतः सुखी कोणीच नाही. प्रत्येक जण आपापलेच दुःख कुरवाळत बसला आहे. दुसऱ्यांच्या दुःखापेक्षा आपले दुःख कसे मोठे हे सांगण्याची चढाओढ सुरु आहे. अशातच मनःस्ताप देणाऱ्या व्यक्तींचा गराडा आपल्या भोवती असतोच, कधी कधी तर जिवाभावाची नातीदेखील उपद्रवी वाटू लागतात, छळ करतात. अशा लोकांना सोडून पळ तरी कुठवर काढायचा? ठिकाण बदलले तर माणसं बदलतील पण वृत्ती सगळीकडे सारखीच असते. अशा वेळी संकटातून पळ न काढता ठाम उभे राहून परिस्थितीशी सामना कसा करायचा हे सांगताहेत सद्गुरू जग्गी वासुदेव.
शब्द हे अनेकांच्या हातातले असे धारदार शस्त्र असते की ज्याच्यावर हे वाकबाण सुटतात, ती व्यक्ती घायाळ झालीच पाहिजे. शब्दाच्या जखमा खोलवर होतात. वर्षानुवर्षे भरून निघत नाही. अशा वेळी या शब्दांचा सामना करणे आणि ते लावून न घेणे हे मोठे कसब असते. ते अंगी बाणायला हवे, असे सद्गुरू सांगतात. यासाठी ते रातकिड्याचे उदाहरण देतात.
'जे लोक तुम्हाला टोचून बोलतात, टोमणे मारतात, अपमान करतात, निंदा करतात, त्यांचे बोलणे ऐकून तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. पण संध्याकाळ झाली की घराच्या कोपऱ्यातून, बाहेरच्या अंगणातून, झाडाझुडुपातून रातकिड्याची किरकिर सुरु होते. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता का? त्याला शोधून गप्प बस सांगण्याचा प्रयत्न करता का? असे शेकडो किडे, पक्षी घराबाहेर आवाज करत असतात, त्यांच्या भाषेत बोलत असतात, त्या सगळ्यांचे बोलणे तुम्ही ऐकता का? समजून घेण्याचा प्रयत्न करता का? मनाला लावून घेता का? त्यांच्याशी हुज्जत घालता का? नाही ना! मग आपल्याला बोलणारी व्यक्ती सुद्धा त्याच रातकिड्यासारखी आहे असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष करा. ती तिच्या भाषेत बोलत राहील, तुम्हाला डिवचत राहील. पण रातकिड्याकडे तुम्ही जसे दुर्लक्ष करता, तसे दुर्लक्ष त्या व्यक्तीकडे करायला शिकलात तर त्यांचे बोलणे तुम्हाला म्यूट केलेल्या चित्रासारखे वाटेल. जे दिसते पण ऐकू येत नाही. ही स्थिती कृतीत आणणे अवघड आहे पण अशक्य नाही.
त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करू लागलात की त्याचाही त्या व्यक्तीला त्रास होतो. तो आपोआप तुमचा मार्ग मोकळा करतोय. तोवर तग धरायला हवी, तरच परिवर्तन घडेल. लक्ष देऊन ऐकण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐका, त्या पहा, फक्त अशा विचित्र लोकांच्या मागे किंवा त्यांना सुधारण्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नका.
किडे जोवर फक्त आवाज करतात, तोवर तुम्ही दुर्लक्ष करता! मात्र तोच कीडा जेव्हा तुमच्या अंगावर येईल, तेव्हा त्याला गोंजारत न बसता त्याचे काय करायचे हे तुम्ही जाणता! त्याचप्रमाणे त्रास देणारे उपद्रवी घटक जोवर फक्त बोलून तुमचा तिरस्कार करत असतील तोवर तुम्ही दुर्लक्ष करू शकता, मात्र प्रकरण अंगाशी आले तर काय करायचे, हेही तुम्ही जाणता! मग त्रास किती करून घ्यायचा आणि किती दुर्लक्ष करायचे हे तुम्हीच ठरवा!