एकदा एक शिक्षक वर्गातल्या विद्यार्थ्यांसमोर एक शंभर रुपयांची नोट धरतात. मुलांना त्याची किंमत विचारतात. सगळी मुलं एकसुरात सांगतात, शंभर रुपये!शिक्षक विचारतात, कोणाकोणाला ही नोट हवी आहे? सगळी मुले हात वर करतात.
मग शिक्षक तीच नोट हाताच्या मुठीत घट्ट धरून चुरगळून टाकतात. आणि ती चुरगळलेली नोट दाखवत विद्यार्थ्यांना विचारतात, आता याची किंमत किती आहे सांगा? मुलं पुन्हा एक सुरात सांगतात, शंभर रुपये....!शिक्षक विचारतात, कोणाकोणाला ही नोट हवी आहे?सगळी मुले हात वर करतात.
आता तीच नोट शिक्षक आपल्या चपलेखाली टाकतात. चुरगळलेल्या नोटेला माती लागते, ती आणखी चुरगळते. मुलांना ते आवडत नाही. शिक्षक ती नोट उचलून पुन्हा वर्गासमोर धरतात आणि विचारतात, आता या नोटेची किंमत किती? मुलं एक सुरात म्हणतात, शंभर रुपये....!शिक्षक विचारतात, कोणाकोणाला ही नोट हवी आहे?सगळी मुले हात वर करतात.
यावरून शिक्षक मुलांना सांगतात, मुलांनो, ही नोट कितीही चुरगळली, त्याला माती लागली तरी ती जोवर फाटत नाही, तिचे तुकडे होत नाहीत तोवर तिची किंमत बदलत नाही. तुम्ही सुद्धा या नोटेसारखे व्हा! तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला चुरगळून टाकण्याचा प्रयत्न करेल कोणी तुम्हाला पायाखाली तुडवल्यासारखी वागणूक देईल, पण तुम्ही स्वतः तुटून जाऊ नका, तरच लोक तुमची किंमत करतील आणि तुमचे महत्त्व टिकून राहील.
तुमची किंमत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील.... हे मनावर कोरून ठेवा आणि तसेच किमती व्यक्तिमत्त्व घडवा!