'चष्मा बदलो फिर देखो यारो' हे गाणे तुम्ही ऐकले असेल. गाण्याचा मतितार्थ सांगतो, की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. दृष्टी बदलण्यासाठी चष्म्याचा उपयोग होऊ शकतो का? की दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे? त्यासाठी पुढील गोष्ट वाचा...
एक शेठजी होते. पैशांचा त्यांना प्रचंड माज होता. आपल्या अहंकारापुढे ते कोणालाही नीट वागवत नसत. त्यामुळे लोकांमध्ये मिसळणे दूरच, त्यांचे कोणाशी फार बोलणे चालणेही नव्हते.
शेठजींना वाचनाचा मोठा व्यासंग होता. नव्या ठिकाणी, नव्या देशी गेल्यावर तिथल्या संस्कृतीचे, साहित्याचे पुस्तक विकत घेत असत. घरी आल्यावर वाळवीच्या वेगाने पुस्तकांचा फडशा पाडत असत.
वयोमानानुसार त्यांची दृष्टी हळू हळू कमकुवत होत होती. त्यांनी डॉक्टरांना समस्या सांगितली. शेठजींची श्रीमंती पाहून डॉक्टर वाट्टेल तो उपाय सुचवू लागले आणि शेठजी डोळे बंद करून विश्वास ठेवू लागले. अनेक डॉक्टर झाले, अनेक औषधोपचार झाले, पण गुण येईना. शेठजी निराश झाले. त्यांना आणखी एका डॉक्टरांचा पत्ता मिळाला. शेठजींनी त्या डॉक्टरांनाही गाठले.
अति वाचनामुळे दृष्टीवर ताण आला असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी शेठजींना साहित्यिक भाषेत उपाय सांगितला, ' शेठजी, पुढील काही दिवस तुम्ही फक्त हिरवा रंग पहायचा.'
पुढचे काही ऐकण्याआधी शेठजी उपचार शुल्क देऊन रवाना झाले. त्यांनी ठरवले आणि घरात जिथे नजर जाईल तिथे हिरवळ दिसेल अशी व्यवस्था करवून घेतली. अंगणापेक्षा घरातच फुलझाडांनी गर्दी केली. परंतु फारसा फरक पडला नाही. मग शेठजींनी घराच्या भिंती हिरव्या रंगाच्या करायचे ठरवून घेतले. रंगारी बोलावले आणि हिरवा रंग मारायला सांगितला. सगळ्या घराला एकसारखा रंग, या विचाराने रंगारी गोंधळला. त्याने भीतभीत शेठजींना कारण विचारलं. त्यावर शेठजी म्हणाले, मला दृष्टिशोध दूर करण्यासाठी डॉक्टरांनी हिरवा रंग बघायला सांगितलं आहे.
त्यावर रंगारी हसून म्हणाला, अहो शेठजी हिरवा रंग दिसला पाहिजे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. तुम्ही केलेले खटाटोप व्यर्थ आहेत. एवढी रंग रंगोटी करण्यापेक्षा हिरवा गॉगल लावला असता, तर सगळं जग आपोआप हिरवे दिसले असते. रंगारीच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि शेठजींना स्वतःचेच हसू आले.
म्हणून प्रश्नांचा विचार करू नका. उत्तर शोधण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करा. प्रश्न आपोआप सुटतील.