ज्योत्स्ना गाडगीळ
संकटसमयी आपल्या संयमाचा खरा कस लागतो. परंतु संयम आता राहिलाय तरी कुठे? कोव्हीड काळात सर्वार्थाने हतबल झालेला मनुष्य जगण्याची उमेद गमावून बसला आहे. त्याला गरज आहे, आश्वासक शब्दांची. असे शब्द, जे सुखी आणि समाधानी आयुष्याचे रहस्य उलगडून सांगू शकतील. यासाठीच ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आंतराष्ट्रीय व्याख्यात्या ब्रह्मकुमारी शिवानी दीदी 'लोकमत भक्ती' या युट्यूब चॅनेलद्वारे आपल्या भेटीला येणार आहेत. लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांचे शुभ्र, शांत व्यक्तीमत्त्व, मधुर वाणी आणि संयत विचार श्रोत्यांना दिलासा देतात. शिवानी दीदी स्वत: उच्चशिक्षित असून त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवचनातून देश-विदेशातील लोकांना सकारात्मक दृष्टीकोन दिला आहे. हीच सकारात्मकता आपल्या दैनंदिन आयुष्यातही यावी, म्हणून त्या, कौटुंबिक प्रश्न, मानसशास्त्र, मनुष्यविकास, परस्परप्रेम, मन:शांती, आध्यात्मिक प्रगती इ. उपयुक्त विषयांवर सहजसोप्या शैलीत मार्गदर्शन करतात. त्यांचे विचार दुसऱ्याला विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या विचारांवर आपणही विचार करावा आणि त्यानुसार कृती करावी, म्हणून 'सुखी आणि संतुष्ट जीवनाचे रहस्य' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. श्रोत्यांनीदेखील या चर्चासत्रात जरूर सहभागी व्हावे आणि संघर्षमय परिस्थितीशी लढण्याचे बळ शिवानी दीदी यांच्याकडून मिळवावे.