'सुख के सब साथी, दुख में ना कोई...' गेले काही महिने आपण सगळेच या गाण्याची पुरेपूर अनुभूती घेत आहोत. अडी-अडचणी, कठीण प्रसंग, संकटांचा ससेमिरा पाहता आपल्यातला संयम संपतोय की काय, आपली श्रद्धा डमळीत होते की काय, देवावरचा विश्वासच उडतोय की काय, अशा प्रश्नांनी मनात काहूर उठते. या सर्व शंकांचे निरसन करणार आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै. २४ ऑक्टोबर रात्री ८ वाजता, 'देव, भक्ती आणि मी' या लोकमत लाईव्ह या युट्यूब चॅनेलवर अभिनेत्री आश्विनी कासार त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
कोरोना महामारीत घरोघरी आलेला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ताण घालवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने झटत आहे. मात्र, जिथे प्रयत्न थांबतात, तिथे दैवावर हवाला टाकला जातो. परंतु, तिथेही निराशा पदरात येते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती 'देव, अध्यात्म आणि मी' चक्रात अडकते. त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज लागते, योग्य मार्गदर्शनाची. निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रासादिक वाणीतून आपल्याला ती उत्तरे नक्कीच सापडतील, अशी अपेक्षा आहे. यासाठी आपणही या लाईव्ह चर्चासत्रात जरूर सहभागी व्हा आणि आपल्या शंकांचे निरसन करून घ्या.