आज प्रत्येकजण आपआपल्यापरीने भगवंताची कृपा दृष्टी प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी भव्य-दिव्य पूजा-अर्चा, देवदर्शन, दानधर्म यासारख्या विविध मार्गांचा अवलंब करतो.परंतु, काही संत महात्म्यांनी भगवंत हा स्वतःच्या नजरेतून शोधण्याचा प्रयत्न केला. कुणी माणसात शोधला कुणी कामात..कुणी अखंड नामस्मरणात तर कुणी अभंग ,कीर्तनातून त्याला अनुभवले.पण तरी त्याचा ध्यास हा न संपणारा..मात्र परमेश्वराच्या मनातलं भक्तीभावाचं रूप हे अनन्यसाधारण असे आहे. त्याचं दर्शन हवे हवेसे वाटणारे असते.
संत तुकाराम महाराज , समर्थ रामदास स्वामी यांना परमेश्वरावाचून दुसरे काही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले, परंतु भाऊ म्हणाला, ’बाळ, तू अजून लहान आहेस.’ रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली.
परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातिधर्मावर अवलंबून नाही; ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरूरीचे आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले , "रामा मी देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्यावाचून जगणे मला अशक्य आहे." एवढे प्रेम,एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार आहे!
परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही.
परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही ? परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर, भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते.
त्यामुळे परमेश्वराच्या कृपाछत्रासाठी आपलेही कर्म तितकेसे चांगले ठेवणे गरजेचे आहे. आपल्या मनातला अहंकार मिटायला हवा. मन अगदी निर्मळ, विचार अगदी शुद्ध आणि अंतःकरणात सदैव संवेदना, प्रेम, करुणा,सदभाव यांचा सहवास असायला हवा..तेव्हा कुठे तो परमेश्वराच्या दरबाराचा राजमार्ग आपल्यासाठीखुला होईल..