बाल, तारुण्य , प्रौढ आणि वृद्ध अशा चार अवस्था माणसाच्या जीवनात क्रमाने येत असतात. पैकी पहिल्या तीन अवस्था जगताना माणूस उत्साहात असतो कारण तिथे रोज काहीना काही नवीन घडत असतं किंवा नवीन काहीतरी घडवण्याच्या उमेदीत तो असतो. तोपर्यंत त्याला जीवन जगायची असोशी असते.
साठीच्या पुढे ज्याचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असतं तोही तसा उत्साहात असतो. कारण त्याला पूर्वी नोकरीमुळे मोकळा वेळ मिळालेला नसल्याने देशांतर्गत पर्यटन , परदेशवारी करायला वेळ मिळालेला नसतो पण आता त्याला ते शक्य असतं. हे सगळं पासष्टीपर्यंत उरकतं. मग मात्र रिकामा वेळ त्याला खायला उठतो. हळूहळू प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू होतात आणि मग गाडी हळूहळू उताराला लागते.
वयोमानानुसार प्रकृतीची साथ मिळेनाशी होते. तसेच हळूहळू घरातले महत्वही कमी होत जाते. मत विचारात न घेता परस्पर महत्वाचे निर्णय घेतले जातात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मनुष्य हळूहळू जीवनाला कंटाळू लागतो.. पण म्हणून काही जगणे सोडता येत नाही. आयुष्य आहे तोवर जगावेच लागते पण ती एक कंटाळवाणी यात्रा ठरते. शेवटीशेवटी तर कधी सुटका होईल असे वाटत राहते.
जीवन उत्साहानं जगण्यासाठी माणसासमोर काही आव्हान असणं आवश्यक आहे. कारण आव्हानाची पूर्तता करण्यात माणूस गुंतून पडतो. पण म्हातारपणी माणसापुढे एकदम असे आव्हान कसे उभे राहील ? म्हणजे असे आव्हान कोणते ते हुडकण्याची तयारी जो पूर्वायुष्यात करेल त्याला उत्तरायुष्यात त्या आव्हानाचा सामना करण्यात वेळ चांगला गेल्यामुळे कंटाळा येणार नाही. उलट त्याचा उत्साह उत्तरोत्तर वाढता राहील.
माणूस ही भगवंतांचीच निर्मिती असल्याने माणसाला आयुष्याचा कंटाळा येऊ नये यादृष्टीने स्वच्या स्वरूपाचा शोध हे आव्हान भगवंतांनी त्याच्यापुढे उभे केले आहे पण भगवंत ज्याप्रमाणे प्रकृतीत म्हणजेच त्यांच्याच मायाशक्तीत गुंतून पडून एकाचे अनेक झालेत त्याप्रमाणे मनुष्य हाही भगवंतांचा अंश असल्याने मोहमायेच्या जंजाळात गुंतून स्वतःचं मूळ स्वरूप विसरून स्वतःभोवतीची आवरणं वाढवत जातो. जीवनामध्ये जेवढ्या लवकर हा गुंता लक्षात येईल तितक्या तीव्रतेने मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आणि तो गुंता सोडवण्यातला आनंद घेत घेत कधी अंतिम समय आला हे त्याचं त्यालाही कळणार नाही. म्हणजेच शेवटपर्यंत त्याला जगवंस वाटत राहतं.
एव्हढंच नाही तर त्याला स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जाते मग त्यात त्याला वाढतं वय , प्रकृती , समाजातील उपेक्षा या कशाचाही अडथळा जाणवत नाही..