Lunar Eclipse October 2023 India: ऑक्टोबर महिना अनेकार्थाने महत्त्वाचा आणि विशेष ठरत आहे. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण लागणार आहे. लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने चंद्रग्रहण लागणार आहे. सर्वपित्री अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसले तरी कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहणभारतात दिसणार आहेत. त्यामुळे या ग्रहणाचे वेधादि नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण नेमके कधी? ग्रहणाची स्पर्श, मध्य, मोक्ष आणि वेधारंभाची वेळ काय? जाणून घ्या, सविस्तर... (Chandra Grahan October 2023 Timings In India)
पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. विशिष्ट खगोलीय स्थिती तयार झाली की, चंद्रग्रहण लागते. ऑक्टोबर महिन्यात कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील असेल. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री चंद्रग्रहण लागणार आहे. रात्री ०१ वाजून ०५ मिनिटे ते मध्यरात्री ०२ वाजून २३ मिनिटे असा या ग्रहणाचा पर्वकाल असणार आहे. कोजागिरी पौर्णिमा असल्याने वेधकाळात रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध-सारखेचा नैवेद्य दाखवता येईल. मात्र, प्रसाद म्हणून एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसऱ्या दिवशी घेता येऊ शकेल.
चंद्रग्रहणाचा स्पर्श, मध्य, मोक्ष कधी?
चंद्रग्रहणाचा वेधारंभ शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजून १० मिनिटांपासून सुरु होत असून, ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येऊ शकतील. चंद्रग्रहणाचा स्पर्श रात्रौ ०१ वाजून ०५ मिनिटांनी होणार आहे. रात्रौ ०१ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तर ग्रहणाचा मोक्ष रात्रौ ०२ वाजून २३ मिनिटांनी होईल. ग्रहणाचा पर्वकाल ०१ तास १८ मिनिटे असेल. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०४ वाजून १७ मिनिटांनी प्रारंभ होत असून, शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होत आहे.
भारतासह कुठे दिसणार चंद्रग्रहण?
भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भारतासह अनेक देशांमध्ये ग्रहण दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया, संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य प्रदेश, हिंदी महासागर, दक्षिण प्रशांत महासागर या भागात ग्रहण दिसणार आहे. सुतक आणि ग्रहण काळात तुम्ही चंद्राशी संबंधित मंत्रांचा जप करू शकता, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये जप, नामस्मरण करावे. काही मंत्रांची दीक्षा घेतली असल्यास त्याचे पुरश्चरण करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. मिथुन, कर्क, वृश्चिक व कुंभ या राशींना ग्रहणाचे शुभफल मिळू शकेल. तर सिंह, तूळ, धनु आणि मीन या राशींना ग्रहणाचे मिश्रफल मिळू शकेल. तसेच मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना प्रतिकूल फळ मिळू शकेल.