मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. सन २०२२ मध्ये माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त, व्रतपूजनाची सोपी पद्धत, महत्त्व आणि काही पौराणिक मान्यता... (Maghi Ganesh Jayanti 2022 Date)
पौराणिक मान्यतानुसार माघ मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचे पुत्र गणेश प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. (Maghi Ganesh Jayanti 2022 Shubh Muhurat)
माघी श्रीगणेश जयंती: शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०२२
माघ शुद्ध चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४ वाजून ३८ मिनिटे.
माघ शुद्ध चतुर्थी समाप्ती: शनिवार, ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ३ वाजून ४७ मिनिटे.
शुभ मुहूर्त: शुक्रवार, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून दुपारी १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत.
असे करा गणेश व्रतपूजन
सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर गणेश पूजनाचा संकल्प करावा. चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा वाहाव्यात. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. गणपतीचा जप, नामस्मरण करावे. तसेच आपले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे अन्य विधी करावेत, असे सांगितले जाते. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
काही पौराणिक मान्यता
श्री गणपतीचे, विनायकाचे चरित्र अनेकदृष्टीने मोठे आदर्श असे आहे. माघी चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंती. विनायक चतुर्थी. गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत. एक शिव -पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि अदिती यांचा मुलगा विनायक. महोत्कट विनायक या विनायकाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसतांना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशांना निर्वेधपणे जगता येईल, अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेली शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. तो साजरा करीत असतानाच त्याच्या चरित्रापासून ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे सांगितले जाते.
ठाण्यातील माघी गणेशोत्सवाची परंपरा
भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. ठाण्याला सार्वजनिक माघी गणेशोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १९३१ साली नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. साधारणपणे १२० ते १२२ सार्वजनिक तसेच ५०० ते ६०० घरगुती माघी गणपतींची स्थापना करण्यात येते.