Maghi Ganesh Jayanti 2025 Shani Sade Sati Upay In Marathi: फेब्रुवारी महिन्याची सुरुवात मंगळवारी होत आहे. याच दिवशी माघ शुद्ध चतुर्थी आहे. माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती असते. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीगणेश जयंती आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु, माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्रीगणेश जयंती, गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनाही ओळखले जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी शनिवारी काही उपाय आवर्जून करावेत, असे म्हटले जाते. यामुळे गणपती बाप्पा आणि शनि देव या दोघांचे शुभाशीर्वाद, कृपा-लाभ प्राप्त होऊ शकेल, असे सांगितले जाते.
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत. जसे की, युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे, असे म्हटले जाते. शनिवार हा शनि देवाला समर्पित असल्यामुळे या दिवशी शनि देवाची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे उत्तम मानले जाते. तसेच या दिवशी माघी गणेश जयंती असल्यामुळे गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
कोणाची साडेसाती सुरू आहे? नेमके काय उपाय करावेत?
- विद्यमान घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे.
- नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह शनि हा स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनि कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर मकर राशीची साडेसाती संपणार आहे आणि मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे.
- शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन करावे.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
- ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनीधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.