मयुरेश महेंद्र दीक्षित
त्रिमुख गणपतीची एक उत्तम मुर्ती कोलार च्या मंदिरात आहे त्या मुर्ती चे मधले मुख हे गजमुख आहे आणि दोन्ही बाजुला गरूड मुख व वानर मुख आहे ह्यास आपण त्रिमुख गणपती संबोधु शकतो. त्रिमुख गणपतीचा प्रचार हा वैष्णव काळात झाला असावा. त्रिशुंड गणपतीची उपासना ही दक्षिण भारतात सर्वत्र पसरलेली शैव तंत्रात वर्णन कलेल्या उपासना पद्धतीनुरूप आहे.
श्रीमत्तीक्ष्णशिखाङ्कुशाक्षवरदान् दक्षे दधानः करैःपाशं चामृतपूर्णकुम्भमभयं वामे दधानो मुदा ।पीठे स्वर्णमयारविन्दविलसत् सत्कर्णिका भासुरैःस्वासीनस्त्रिमुखः पलाशरुचिरो नागाननः पातु नः ॥
त्रिशुंड गणपतीची तीन गज मुखे आहेत, ते कमळाच्या आकाराच्या स्वर्णमय सिंहासनावर विरजमान असुन त्यांना सहा हात आहेत. त्या पैकी एका हातात तीक्ष्ण शिखांकुश, दुसऱ्या हातात अक्षमाला, तीसऱ्या हातात पाश व चौथ्या हातात अमृताचा पुर्ण कुंभ आहे आणि दोन हाथ अभय मुद्रेत आहेत .
त्रिशुंड गणपतीचे सहा हात ही सहा वेदांगे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त , छंद , व ज्योतिष आणि त्या हातांनी धारण केलेली आयुधे किंवा मुद्रा म्हणजेच न्याय, वैशेषिक,सांख्य,योग,पुर्व मीमांसा व उत्तर मीमांसा ही सहा दर्शने आहेत.आगम व निगम रूपी दोन चरण कमले आहेत .
त्रिशुंड गणपतिच्या रूपात तीनही मस्तके हत्तीची असेल तर अश्या गणपतीला त्रिशुंड गणपती म्हणतात. काहीवेळा एकच मुख पण त्रिशुंड (तीन सोंड ) दाखविली जातात. बरेचदा त्रिमुख गणपती व त्रिशुंड गणपती यांची एकत्रच कल्पना केली जाते परंतु ते भिन्न आहेत .त्रिमुख गणपतीची तीनही मुखे गजमुखे असतील किंवा एका मुखाला तीन सोंड असतील तर तो त्रिशुंड गणपती होय.
गणपतीची तीन शुंड म्हणजेच जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थांचे प्रतिक आहेत तर त्याचा एकदंत ही तूरीयावस्था आहे. ईश्वराच्या सूक्ष्मरूपाचे ध्यान करवायाचे असल्यास प्रथम ते मानवी इंद्रियांना दिसेल , भासेल अशाच रूपाच्या माध्यमातुन करावे लागते व एकदा बाह्यरूप समजले तर सुक्ष्म रूपाची ओळख होते. ही ओळख त्वरीत पटावी आणी ज्ञानाच्या अथांगसागरात प्रवेश केलेल्या चित्ताला अणुरूप पहावयाची मदत व्हाही म्हणुनच गणेश पुराणात वर्णन केले आहे,
गणेशमूर्तीप्रसादं कारयामास सुन्दरम् ।वरदेति च तन्नाम स्थापयामास शाश्वतम् ।सिद्धिस्थानं च तत्रासीद् गणेशस्य प्रसादतः॥
त्रिशुंड गणपती हा उत्पती स्थिती व लय ही सृष्टीची कार्ये नियंत्रण करणाऱ्या त्रिशक्तिंचे एकत्व दर्शविणारे रूप आहे. तत्र वैनायकं यन्त्रं चतुर्द्वार विराजितम् प्रासादाच्या चारही दरवाजांवर विनायक यंत्र विराजमान करावे असे ब्रह्माण्ड पुराणात सांगीतलेले आहे . म्हणजे गणेशाची मुर्ती उपासना व यंत्र उपासना दोन्हीही तांत्रिक उपासना पद्धती देखील पुराण काळापासुन समाजात विद्यमान आहेत. धर्मशास्त्राच्या मर्यादा संभाळून ज्यांना विशिष्ट फलदायक उपासना करावयाची असेल,त्यांनी गुरूपरंपरेद्वारे बीजरूपात्मक, सावरण, यथाशास्त्र विधानांनी यंत्राची पुजा करावी. अक्षर मातृकांनी सुनियंत्रित झालेली देवता यंत्ररूपात वास करीत असल्याने आपला आत्मविश्वास पूर्ण जागृत होतो , धैर्य वाढते, संकटे टळतात आणि अंतिम साध्य असलेले मनःशांतीचे सौख्य प्राप्त होते. त्याच प्रमाणे चतुर्थीव्रत , भाद्रपदातील गणेश उत्सव , माघी गणेश जयंती उत्सव आजही लोक मान्य आहेत . त्रिशुंड गणपती हे तंत्र मार्गातील शैवशक्ती उपासकांच्या भावधारेतुन प्रकट झालेले एक अनोखे रूप आहे.
त्वं मुलाधारस्थितोऽ नित्यम् मूलाधारचक्रांत कुंण्डलीनी शक्ती आहे, मूलाधाराचा अधिपती गणपती आहे, गणपतीच्या ध्यानाने कुण्डलीनी जागृत होते व स्वाधिष्ठान, मणिपूर , अनाहत , विशुद्धी आणि आज्ञा चक्राचे भेदन करत सहस्त्रार चक्रामध्ये स्थित शिवाशी मिळते व जीवाचे शिवात रूपांतर होते तेथे बनतो
शिवशक्ति सामरस्य योग. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि गाणपत्य योगामध्ये चिन्मयी नाद शक्ति म्हणजेच गणपती समजून षट्चक्रात महागणपतीचे ध्यान केले जाते. मूलाधारात पृथ्वीतत्व आहे , गंध तिचा धर्म आहे, म्हणून पार्थिव रूपांत गणेशाची पुजा होते . पार्थिवात अपार्थिव ईशाचे पूजन होते. अपार्थिवाचे आवाहन व पार्थिवाचे विसर्जन हीच खरी अनंतचतुर्दशी आहे. चतुर्दश विद्यास्थानात निर्गुण निराकाराचे सगुण साकार रूपात पुनरागमनाय विसर्जन आहे .
(अधिक माहितीसाठी 'गूढ त्रिशुंड गणेशाचे' हा ग्रंथ जरूर वाचावा. यामध्ये विविध क्षेत्रातील विद्वानांचे लेख आहेत.)