आज माघी गणेशोत्सव! महोत्कट विनायकाने जन्म घेतला ती आजची माघ शुद्ध चतुर्थी! आजचा दिवस आपण माघी गणेशोत्सव म्हणून साजरा करतो. यानिमित्त अनेक सण समारंभाचे आयोजन केले जाते, पण व्यक्तिशः भगवंताची भेट घेतल्यावर आशीर्वाद रुपी त्याच्या कडे काय मागावे हा आपल्या मनात गोंधळ असतो. कारण आपल्याकडे इच्छांची लांबलचक यादी असते, पण मोजकंच आणि चांगलं मागावं असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा पुढील मागणं मनापासून मागावं! बाप्पा निश्चितच इच्छापूर्ती करेल!
आपल्या हातून पुण्य एकवेळ होणार नाही, पण दिवसभरात पापं अगणित होत असतात. आपण साधे श्वसन करतो, तेव्हा आपल्या श्वसन मार्गावाटे कितीतरी सूक्ष्म जीव जीवाणूंना त्रास होतो. आपल्या हातून कळत नकळत किडा मुंगी मारले जातात. चालता बोलता पायाखाली सूक्ष्म जीव मारले जातात. शिवाय आपल्याला अडथळा होणाऱ्या प्राण्यांचा कीटकांचा आपण खात्मा करतो, तो भाग वेगळा. यापलीकडे आपल्या बोलण्यातून, कृतीतून कितीतरी जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुखावले जातात. जाणून बुजून आपण ज्यांना दुखावतो, त्रास देतो ही त्यात आणखी एक भर. अशी जर रोजची यादी करायची ठरवली, तर आपल्या पापांचा घडा नुसता भरणार नाही, तर ओसंडून वाहील. जितकी पापं कळत नकळत पणे होतात, त्या पापांचे परिमार्जन व्हावे, घडा रिकामा व्हावा आणि तो आपल्या सत्कर्माने, पुण्याने भरावा, यासाठी आपल्याला बालपणी छान प्रार्थना शिकवली होती. तिचाच पुनर्वापर करावा.
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानु कोटी,मोरेश्वरा बा तू घाल पोटी।।
हे गणराया, आमच्या कडून रोजच्या रोज कोट्यानुकोटी अपराध घडत आहेत. त्यांची संख्या कमी व्हायची सोडून वाढतच आहे. तसे झाले, तर आमच्या वाट्याला येणारे भोग सहन करता करता आमचे आयुष्य खर्च होईल. म्हणून तू मोठ्या मनाने, मोठ्या दिलाने आमचे अनंत अपराध तुझ्या पोटात घाल. आमच्या कर्माचा घडा रिता झाला, की आम्ही पुन्हा चांगल्या कार्याचा श्रीगणेशा करण्याचे तुला वचन देतो.
प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनि बुद्धी मती दे, आराध्य मोरेश्वरा,चिंता क्लेश दरिद्र दुख अवघे, देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहु तोषवी।।
हे गणनायका, गजमुखा, बा हेरंबा, आमच्या हातून सत्कार्य घडावे म्हणून तुझ्या नावाने प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करतो. बुद्धी आम्हा सर्वांकडे आहेच, पण तिचा यथायोग्य वापर तू करून घे. साऱ्या विश्वाची चिंता, क्लेश, दारिद्र, दुःख तू दूर कर आणि सर्वांना सुखात, आनंदात ठेव. हे दान आमच्या पदरात टाकून आम्हाला संतुष्ट कर.
इतक्या तन्मयतेने प्रत्येकाने आपल्या पापांची कबुली दिली आणि चांगले वागण्याची हमी दिली, तर बाप्पा आपली हाक का बरे ऐकणार नाही? गणपती बाप्पा मोरया!!!