आज माघी गणेशोत्सव! यानिमित्ताने अनेक ठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. यात गणपती बाप्पा मोरया पाठोपाठ उंदीर मामा की जय, म्हणण्याची टूम सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी गंमत म्हणून एखाद वेळेस म्हणणे ठीक आहे, परंतु उंदीर हे रूपक असून आपले यश, सुख, समृद्धी कुरतडणाऱ्या गोष्टींचे ते प्रतिक आहे. त्यावर बाप्पाने अंकुश मिळवून ताबा ठेवला आणि आपण मात्र मजे मजेत खलवृत्तीचा जय जयकार करत आहोत. ते थांबायला हवे. त्यासाठी पौराणिक कथा आणि या रुपक कथेमागील तर्कशास्त्र याचा नीट विचार करायला हवा.
गणपतीचे वाहन म्हणून उंदिर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना ती ठेवणे अत्यावश्यक मानले जाते, तसे उंदराजवळ विंâवा उंदराऐवजी मोर हवाच असा आग्रह कोणी धरत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे, हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी नावे दिलेली आढळतात. तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे. आता एवढासा उंदीर त्याच्यावर एवढा मोठा बाप्पा स्वार तरी कसा होणार? आणि स्वार झाला तरी गणपतीला पाठीवर घेऊन उंदीर कसा धावणार?
उंदीर हा गणपतीचे वाहन का झाला त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी, क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू उंदीर होशील, असा शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व उंदीर झाला आणि उंदराच्या रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते, ते खाऊन टाकले व खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन परशर ऋषींनी उंदरापासून मुक्तता व्हावी, म्हणून गणरायाची प्रार्थना केली. श्रीगणेश तिथे प्रगट झाले. त्यांनी आपला पाश उंदरावर टाकला. उंदराची सुटका होणे कठीण. तो शरण आला. प्रसन्न झालेल्या बाप्पाने त्याला `वर माग' म्हटले. घाबरलेल्या उंदराला काय मागावे सुचलेच नाही. मात्र अन्न धान्य खाऊन मदमस्त झालेला उंदीर बाप्पाला म्हणाला, `तुमच्याकडून काही नको, माझ्याकडून काही हवे असेल तर मागा.' यावर बाप्पा हुशारीने म्हणाले, `ठीक आहे, आजपासून तु माझे वाहन हो.' उंदराचा गर्व उतरला, पण आता त्याला सेवा देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला बाप्पाचे ओझे उचलावे लागले.
ही झाली रुपकात्मक कथा. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. उंदीर हा शेतीचा नाश करणारा आहे आणि गणपती हा शेतकऱ्यांचा देव असल्यामुळे त्याने उंदराला अंकित करून घेतले आहे. असेही एक मत किंवा एक तर्क या विषयात सांगतात.
गणपती हा शेतकऱ्यांचा देव आहे. याचे स्पष्टीकरण देताना गणपतीचे शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान ही शेतकऱ्याची दोन सुपे आहेत आणि गणपतीची सोंड ही भाताच्या लोंब्यांसारखी आहेत, असेही सांगितले जाते. गणपती हे सूर्याचेही एक रूप असून तो दिवसाचा सूर्य म्हणून रात्रीवर आरूढ झाला आहे आणि उंदीर हा रात्री सर्वत्र संचार करत असल्यामुळे रात्ररूपी उंदरावर गणेशरूपी सूर्य आरूढ झाला असेही सांगितले जाते. एक गोष्ट मात्र खरी, उंदीर हा थोड्याच वेळात मोठ्या संख्येने वाढू शकतो. उंदराच्या जातीची वाढ फार झपाट्याने हाते. त्याच्यावर नियंत्रण गणेशाने आणले आणि त्याच्या कुरतडण्याच्या, तसेच नासधूस करण्याच्या वृत्तीला कायमस्वरूपी आळा घातला.
त्यामुळे यापुढे बाप्पासाठी नाही, तर निदान आपल्या बळीराजाच्या शत्रूसाठी तरी उंदीरमामाचा जाणीवपूर्वक जयघोष थांबवूया आणि इतरांनाही तसे करण्यापासून परावृत्त करूया.
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!