समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. अशी महाशिवरात्रीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. तर काही ठिकाणी हा दिवस शिव पार्वतीचा विवाह दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच या दिवशी शिवतत्त्व साकार झाले, असेही म्हटले जाते. पौराणिक संदर्भ वेगवेगळा असला, तरीदेखील महाशिवरात्रीच्या उत्सवाचा उत्साह शिवगणांमध्ये एकसारखा दिसून येतो.
महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी यात्रा भारतात, कथा, कीर्तने होतात. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. परंतु कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर यंदा महाशिवरात्री घरीच साजरी करावी लागणार आहे. परंतु एकार्थी ते बरेच आहे, असे म्हणता येईल. कारण यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी पंचक आल्याने पंचांगाने तो दिवस व्यर्ज्य ठरवला आहे.
पंचक कुठे लागू होते?
एखादी व्यक्ती निधन पावते, तेव्हा लोक पंचांग पाहून त्या दिवशी पंचक नाही ना, याची खातरजमा करून घेतात.कारण पंचक लागले असता एकासह आणखी पाच जणांचा मृत्यू संभवतो किंवा परिचीत-अपरिचित पाच जणांच्या निधनाच्या बातम्या कानावर पडतात. पंचकाचे सावट टाळण्यासाठी अंतिम विधीबरोबरच आणखी एक विधी केला जातो, त्यामुळे पंचकाची भीती टळते.
पंचक काळात हे टाळावे : महाशिवरात्रीच्या दिवशी पंचक आल्यामुळे उत्सवावर भीतीचे सावट नको, म्हणून दक्षिण दिशेने प्रवास शक्यतो टाळला पाहिजे. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. म्हणून त्या दिवशी दक्षिण दिशेशी निगडित खरेदी, विक्री, प्रवास टाळायला हवा.
पंचक काळ : महाशिवरात्रीच्या दिवशी पंचक काळ ११ मार्च रोजी ९.२१ मिनिटांनी सुरु होऊन थेट १६ मार्च रोजी सायंकाळी ४. ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे.
तसे असले, तरीदेखील शिवपूजेमुळे या दिवसाचे महत्त्व नक्कीच वाढते. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन या ऋतुधील सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. पूजेसाठी शुभमुहूर्त -
माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ : ११ मार्च २०२१ रोजी दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे.
माघ वद्य चतुर्दशी समाप्ती : १२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटे.
निशीथकाल : ११ मार्च २०२१ रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून २४ मिनिटे ते ०१ वाजून १३ मिनिटे.
मनावर दडपण न ठेवता निःसंकोचपणे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करा आणि या जगाचा रक्षक अशी ख्याती असलेल्या देवाधिदेव महादेवाला मनोभावे शरण जा.