महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र उत्सव आहे. मात्र, उत्सवाला गालबोट लागेल, असे कृत्य काही समाजकंटक करतात. त्यांच्या कृत्यावर आळा घालणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यांना विरोध करताना नकार देण्यासाठी आपल्याला योग्य कारण माहित असले पाहिजे. ते कारण काय, हे जाणून घेऊया.
महादेव चिलिम ओढत, मद्यपान करत, भांग पित, नशा करत असा अपप्रचार कोणी आणि कधी केला हे सांगू शकत नाही. परंतु, आपण आपल्या सद्सदविवेकबुद्धीने विचार केला, तर आपल्याला सत्य असत्य यातील भेद कळू शकेल.
अनेक जण महाशिवरात्रीला शिवशंकराचा प्रसाद म्हणून अधिकृतपणे मद्यपान करतात, भांग पितात. परंतु, हा अत्यंत चुकीचा आणि किळसवाणा प्रकार आहे. यात महादेवाचे नाव पुढे करून आपली चैन करणे, एवढाच व्यसनी माणसाचा हेतू असू शकतो.
मुळात भांग हा शब्द शिवशंकरांशी का आणि कसा जोडला गेला, ते पाहू.
समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर निघाले, ते प्राशन करण्यासाठी शिवशंकर पुढे आले. त्यांनी तो विषप्याला रिचवला. त्यामुळे त्यांच्या सबंध देहाचा दाह झाला. त्यांना शांत करण्यासाठी नानाविध उपाय केले गेले. अंगाला विभूती लावली, सर्प गुंडाळले, मस्तकावर गंगा धारण केली, शितल चंद्रमा कपाळावर चढवला, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, तरी गुण येईना. मग आयुर्वेदिक उपचार करून पाहिले.
विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विजया झाडाची पाने अर्थात भांगेची पाने, बेलपत्र, धोतऱ्याच्या फुलांचे दूध एकत्र करून शिवशंकराला पाजले होते. एवढे उपाय केल्यावर त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला पण पूर्ण शांत झाला नाही. शेवटी राम नाम घेतल्यावर ते पूर्णपणे शांत झाले.
याचाच अर्थ आजही भांग ही औषधी वनस्पती फक्त रुग्णावर उपचार म्हणून वापरली पाहिजे. नशा म्हणून त्याचे सेवन करणे योग्य नाही आणि शिवशंकराच्या नावावर, महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्यसनाधीन होणे, तर पूर्णपणे अनैतिक आहे.
आता काही जण सांगतील, की भांगेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. निश्चितपणे आहेत. परंतु औषधाची गरज रुग्णाला असते आणि औषधाची मात्रादेखील निश्चित असते. निरोगी माणसाला औषधाची गरज लागत नाही. तरीदेखील तो त्याचे सेवन करत असेल, तर त्याला व्यसनी म्हटले पाहिजे, शिवभक्त नाही!!!
अशा रीतीने शिवरात्रीच्या पवित्र सोहळ्याचे पावित्र्य जपूया आणि उत्सवाच्या नावावर नशा करणाऱ्यांना रोखूया.