दिनदर्शिकेवर आपण दर महिन्यात शिवरात्री असा उल्लेख पाहतो. परंतु शिवरात्र असूनही तो दिवस विशेष साजरा केला जात नाही किंवा उपास करा असेही सांगितले जात नाही, मात्र महाशिवरात्रीला समस्त शिवभक्त हटकून उपास करतात आणि शिव आराधना करतात. दोन्ही शिवरात्रीचे प्रकार असूनही एक शिवरात्री महा शिवरात्र म्हणून ओळखली जाते आणि अन्य शिवरात्री मासिक शिवरात्री म्हणून ओळखल्या जातात, असे का? ते पाहू.
शिवरात्री आणि महाशिवरात्री यांमधील फरक :
>>मासिक शिवरात्र दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते. ज्याप्रमाणे भगवान विष्णूंचे उपासक एकादशीचे व्रत करतात तसेच शिवभक्त मासिक शिवरात्रीचे व्रत करतात. मात्र हे व्रत करताना उपास करणे अपेक्षित नसते, तर केवळ शिवपुजेला महत्त्व असते.
>>श्रावण मासात शिवपुजेला महत्त्व असतेच. शिवाय शंकराचा वार सोमवार म्हणून श्रावणी सोमवारी उपास देखील केला जातो. भगवान शंकरांनी त्या काळात समुद्र मंथन झाले असता त्यातून निघालेले हलाहल प्राशन केले होते. त्यांच्या देहाचा दाह शांत व्हावा म्हणून त्यांना शिवपूजेच्या वेळेस पिंडीवर दूध अर्पण केले जाते. भस्म लावले जाते. बिल्वपत्र वाहिले जाते. एवढी शिवपूजा श्रावणात होऊनही महादेवाचा सण म्हणून मान्यता आहे, ती महाशिवरात्रीला!
>>दरवर्षी महाशिवरात्री हा सण माघी कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो. यंदा आदल्या दिवशी म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी सोमवारी प्रदोष असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी १ मार्च रोजी महाशिवरात्री असल्यामुळे दोन्ही दिवस महादेवाची पूजा अर्चा अखंडितपणे सुरू राहणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि देवाधिदेव महादेव यांचा विवाह झाल्यामुळे रात्रभर देवलोकात, कैलासात जल्लोष झाला होता. त्या उत्सवाची आठवण अर्थात आजच्या भाषेत सांगायचे तर लग्नाचा वाढदिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.
>>पौराणिक कथांनुसार या दिवशी महादेवाच्या अग्निलिंगातुन चराचर सृष्टी निर्माण झाली, म्हणूनही हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाची आठवण आणि भगवान शंकराप्रती कृतज्ञता म्हणून दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्रीचा आठव करून शिवपूजा केली जाते.
>>यादिवशी जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेकदेखील केला जातो. अशाच नकळत झालेल्या उपसामुळे तसेच बेलपत्रांच्या अभिषेकामुळे चित्रभानू नावाचा शिकारी शिवलोकात गेला. नकळत घडलेल्या भक्तीतून चित्रभानूला शिवलोक मिळू शकते, तर जाणीवपूर्वक केलेल्या उपासनेमुळे आपला जीव परलोकात जाताना शिवाशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्या दृढ भावनेने शिवकार्य करावे आणि शिव उपासना करावी. वाईट वृत्तीचा संहार करणे आणि चांगल्या गोष्टींना पाठिंबा देणे हेच शिवकार्य आहे. त्या शिवकार्याची तळी उचलुया आणि महादेवाच्या कृपेस पात्र होऊया!