देवाधिदेव महादेव हे भोळे सांब म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मनोभावे केलेली सेवा तसेच कळत नकळत घडलेले सत्कर्म त्यांना किती आवडते आणि त्यामोबदल्यात ते आपल्या भक्ताला काय आशीर्वाद देतात व त्याचा उद्धार कसा करतात हे सांगणारी महाशिवरात्रीची पौराणिक कथा महापुण्यदायी आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त जागरण केले जाते, रुद्राभिषेक केला जातो, भजन कीर्तन केले जाते, त्याचबरोबरीने महाशिवरात्रीच्या कथेचे वाचन आणि श्रवण आवर्जून केले जाते. चला तर आपणही महाशिवरात्रीची कथा वाचून पुण्यसंचय करूया... हर हर महादेव!
महाशिवरात्रीची महापुण्यदायी पौराणिक कथा :
एका व्याधाने व्यापाऱ्याकडून कर्ज घेतले होते. परंतु ते त्याला ठरलेल्या मुदतीच्या आत फेडता आले नाही. त्यामुळे त्या व्यापाऱ्याने व्याधाला शिव मंदिरात खांबाला बांधून ठेवले. दिवसभर शिव शिव असे म्हणत तो व्याध उपाशीपोटी त्या शिव मंदिरात उभा होता. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. व्यापाऱ्याने त्याला संध्याकाळी सोडून दिले. त्याचे कुटुंब पूर्णतः त्याच्यावर अवलंबून होते. त्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लगेच शिकारीच्या शोधासाठी रानात गेला. हिंडता हिंडता रात्री एका जलाशयाजवळ आला. तिथे पाणी प्यायला जे जनावर येईल त्याला मारायचे असे ठरवून तो जवळच्या बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याच्या अंदाजाप्रमाणे काही वेळाने हरणांचा कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला. बाण नीट मारता यावा म्हणून त्या व्याधाने समोर आलेल्या फांदीची बिल्वदले तोडून खाली टाकली. ती तिथेच खाली असलेल्या शंकराच्या पिंडीवर पडली.
हरणांना व्याधाची चाहूल लागून ती तिथून पळून गेली. पहाटे पुन्हा एक हरीण आणि दोन हरिणी त्या जलाशयावर आल्या. त्यावेळी तो व्याध त्यांना बाण मारणार तोच त्या हरिणींनी मनुष्य वाणीत त्याला विनंती केली, हे व्याधा आमची पाडसे घरी एकटी आहेत. आम्ही घरी जाऊन त्यांना दूध पाजून परत येतो.
काही वेळानंतर पाडसांसह तो सगळा कळप पुन्हा व्याधाकडे आला. त्यांच्यापैकी प्रत्येक हरीण व्याधाला 'इतरांना सोडून दे, मला मार' असे सांगत होते. त्यांचे परस्परांवरील प्रेम पाहून व्याधाने त्यांना मारण्याचा विचार बदलला. त्याने प्रेमपूर्वक पूर्ण कुटुंबाला अभय दिले. त्यांना परत पाठवले. स्वतःचे धनुष्यबाण तोडून टाकले. अशा रीतीने रिकाम्या हाताने परंतु समाधानी वृत्तीने तो घरी परतला.
त्या महाशिवरात्रीच्या पुण्यवान दिवशी त्याचा उपास घडला. सत्कार्य घडले. जागरण घडले आणि बिल्व दलांनी पूजा घडली. अनायसे त्याच्याहातून व्रत घडले. त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी व्याधाचा आणि त्या हरणाच्या कुटुंबाचा उद्धार केला व त्या सर्वांना आकाशात स्थान दिले. त्यांचे दर्शन आपल्याला मृग नक्षत्रावर घडते. हे सर्व जीव शिवाशी एकरूप झाले आणि शिवधामी गेले.
आपल्याही जीवाचा उद्धार होऊन आपल्याला मरणोत्तर शिवधामात जागा मिळावी यासाठी आपणही मनःपूर्वक प्रार्थना करूया आणि सत्कार्य करत शिवकृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करूया.