राजकारणामुळे समाजकारणही ढवळून निघते. इतकी वर्षे कधीही न निघालेला मुद्दा अलीकडे चर्चेत आला आहे, तो म्हणजे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्याचे नसून आसाम येथील गुवाहाटीचे ज्योतिर्लिंग आहे असे म्हटले जात आहे. हा गोंधळ झाला आहे तो सारख्या नावांमुळे. ही दोन्ही शिवमंदिरं प्राचीन काळातली आहेत. मात्र, बारा ज्योतिर्लिंगांचा शोध आद्य शंकराचार्य यांनी लावला आणि पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत, म्हणून हे राष्ट्र 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते अशी जोड आणखी संतांनी दिली.
त्या पाचांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतले पुण्याजवळचे भीमाशंकर! त्याचीच पुनर्बांधणी अहिल्या देवी होळकर यांनी केली. त्यामुळे जी मूळ ज्योतिर्लिंग आहेत तिथे आद्य शंकराचार्य आणि अहिल्यादेवींचे मंदिर हमखास असते. हीच ज्योतिर्लिंग ओळखण्याची खूण म्हणता येईल! तसे ते मंदिर महाराष्ट्रातल्या भीमाशंकर जवळ आहे, त्यामुळे ते ज्योतिर्लिंग स्वयंभू म्हणता येईल.
मग गुवाहाटीच्या भीमाशंकरचे काय?
तर शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार कामाख्या देवीजवळदेखील भीमाशंकराचे देवस्थान आहे आणि तेही प्राचीन आहे. मात्र ज्योतिर्लिंगांच्या गणनेत त्याचा उल्लेख करता येणार नाही. कारण ते देवस्थान आदी शंकराचार्यांच्या यादीत आढळत नाही. आदी शंकराचार्य हे शंकराचे अवतार मानले जात असल्याने त्यांनी नमूद केलेली १२ ज्योतिर्लिंगं गृहीत धरता येतील. असे असले तरी गुवाहाटीच्या प्राचीन भीमाशंकराचे पावित्र्य आणि महत्त्व कमी होत नाही.
आता जाणून घेऊ ज्योतिर्लिंग म्हणजे काय? -
ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्योती म्हणजे प्रेरणा. ज्योती म्हणजे चेतना. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! ती एकूण बारा आहेत. त्याचे वर्णन एका श्लोकात केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांची नावे लक्षात राहत नसतील, तर हा श्लोक पाठ करून टाका. या श्लोकाच्या उच्चाराने ज्योतिर्लिंगांचे स्मरण होईल आणि पुण्यही पदरात पडेल.
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ।परल्यां वैद्यानाथंच डाकिन्यां भीमशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने।वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबक गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये।
सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महांकालेश्वर, ओंकारमांधता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढ्या नाननाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होत असते.
ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे. अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ज्योतिर्लिंगे! एकराष्ट्रीयत्त्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवांना प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत.
तूर्तास 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' या संत उक्तीनुसार महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर देवस्थानांवर वाद निर्माण करण्यापेक्षा चराचरात परमेश्वर पाहून निरपेक्ष मनाने शिवभक्ती करणे इष्ट!