शिवरात्र, म्हणजे महिन्यातला चौदावा दिवस आणि अमावस्येच्या आदला दिवस. दर महिन्यात शिवरात्री येते. परंतु माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. यंदा ती १८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेला समर्पित केला आहे. महाशिवरात्रीला दिवसभर उपास आणि रात्री जागरण या गोष्टीला महत्त्व दिले जाते. परंतु का? ते जाणून घेऊ.
सद्गुरु सांगतात, उपासना करायची तर सुरुवात उपासाने करायला हवी. उपास कशाचा? तर ज्या गोष्टींमध्ये मन अडकलेले असते, अशा सर्व गोष्टींचा उपास. त्यातल्या त्यात आहारात आपले मन जास्त अडकलेले असते. भूकेवर नियंत्रण ठेवले, तर मन आहारात गुंतून राहत नाही. पोट रिकामे असले, की बुद्धी जड होत नाही. अन्य विचारांना चालना मिळते. ऐहिक सुखात गुंतलेले मन बाहेर पडून पारमार्थिक सुखाकडे झेपावते. म्हणून सुरुवात उपासाने.
उपासाला उपासनेची जोड देण्यासाठी स्तोत्र, मंत्र, जप अशा धार्मिक गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे देहाबरोबर मन विधींमध्ये गुंतून राहते आणि अन्य विचार डोक्यात शिरकाव करत नाहीत. म्हणून उपास, पूजा आणि विधी यांना महत्त्व आहे.
परंतु जागरण का? कारण महाशिवरात्री हा उत्सव मुळात रात्रीचा आहे. भगवान शिवशंकर हा स्मशानात राहणारा, संसारात असूनही वैरागी वृत्तीचा, हलाहल पचवूनही समाधी अवस्थेत रमणारा देव आहे. त्याला दिवसाच्या कोलाहलापेक्षा रात्र प्रिय आहे. रात्रीच्या शांत वेळी जग झोपलेले असताना तो जागा असतो. जागे राहणे म्हणजे नुसते न झोपणे असे नाही, तर तो जागृत असतो, सावध असतो. महाशिवरात्रीचा उत्सव जागरणाच्या उपचारातून जागृत व्हा असा संदेश देतो.
शिवशंकराला तीन डोळे आहेत असे आपण म्हणतो. पैकी तिसरा डोळा उघडला, तर प्रलय येईल असेही आपण ऐकले आहे. हा तिसरा डोळा केवळ प्रलय घडवण्यासाठी नाही, तर वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा नाश करण्यासाठी आहे. तो केवळ शिवशंकराला नाही, तर आपल्या सर्वांना अदृश्य स्वरूपात आहे. शिवरात्रीच्या रात्री जागरण कराल, तेव्हा त्या तिसऱ्या डोळ्याने स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. वाईट विकारांवर तृतीय नेत्रातून प्रहार करा. विकारी आणि अतिविचारी मनावर आवर घाला.
शिवरात्रीची रात्र ध्यानधारणेची असून आपल्या हृदयात स्थित जीव आणि शिवाची सांगड घालून देणारी असते. तो अनुभव जरूर घ्या. दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप डोकावून झाले, आता थोडे स्वत:च्या आयुष्यात डोकावून पहा. हा तिसरा डोळा तुम्हाला कायमस्वरूपी जागे करील.