'तुज सगुण म्हणो की निर्गुण रे' असा प्रश्न ज्ञानेश्वर माउलींनी उपस्थित केला आहे. याचाच अर्थ संतांनी परमेश्वराला निर्गुण निराकार रूपात पाहिले. मात्र सर्वसामान्य जनाला भगवंताला पाहता यावे, त्याच्या स्वरूपाचे ध्यान करता यावे म्हणून त्यांनी सगुण रुपाचेही वर्णन केले. त्या आधारे आपण सगुण भक्ती करतो. सगुण भक्तीचा प्रवास निर्गुणाकडे नेणारा असतो. महाशिवरात्रीनिमित्त (Maha Shivratri 2025) शिव उपासना करताना आपण सगुण आणि निर्गुण भक्ती एकत्रच करतो. सगुण भक्ती म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली शंकराची आरती म्हणत आर्त साद घालतो आणि निर्गुण भक्ती म्हणजे शिव मूर्तीची पूजा न करता शिवलिंग अर्थात शिवाच्या प्रतीकाची पूजा करतो.
मात्र इतर देवी देवतांची मूर्ती तसेच प्रतिमा आपण घरात ठेवतो, पूजन करतो, मग महादेवाच्या शिवप्रतिमेची वा मूर्तीची पूजा न करता शिवलिंगाची पूजा करतो, त्यामागे काय कारण असावे? याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती जाणून घेऊ.
सरस्वती नदीच्या किनारी सर्वच सप्तर्षी आणि ऋषीमुनी एकत्र येऊन महायज्ञ करत होते. नारदमुनींनी भ्रमण करत असतांना त्यांना पाहिले आणि ते त्यांना भेटायला गेले. त्यांनी ऋषीमुनींना यज्ञाचे कारण विचारले असता सर्व ऋषी मुनींनी त्यांना आपण हा यज्ञ विश्वकल्याणासाठी करत आहोत असे सांगितले. तेव्हा नारदमुनींनी आपली शंका विचारण्याच्या उद्देशाने हा यज्ञ आपण कोणत्या देवतेला अर्पण करत आहात हे विचारले. तेव्हा सर्व ऋषींनी नारद मुनींनाच याबाबत योग्य तो सल्ला द्यावा असे सुचवले.
नारद मुनींनीही मग विश्वकल्याणासारख्या उदात्त कारणासाठी यज्ञ होत असल्याने यज्ञाचे फळ हे त्रिमूर्तींपैकीच(ब्रह्मा-विष्णू-महेश) कुणाला अर्पण करावे असे सुचवले. तेव्हा सर्व ऋषींनी मिळून प्रतिनिधी रूपाने भृगु ऋषींना परीक्षक रूपाने त्रिमूर्ती मधून सर्वश्रेष्ठ देवतेला निवडण्यासाठी पाठवले.
सर्वप्रथम भृगू ऋषी सत्यलोकात म्हणजेच ब्रह्मदेवाच्या घरी गेले. तेथे ब्रम्हा सरस्वती सोबत वेदचर्चेत मग्न होते. त्यामुळे त्यांचे ऋषींकडे लक्ष गेले नाही. पुष्कळ वेळ थांबूनही आपल्याकडे लक्ष न दिल्यामुळे आपला अपमान झाला असे समजून त्यांनी ब्रह्मदेवाला त्यांची पूजा या पृथ्वीतलावर होणारच नाही असा शाप दिला. ब्रह्मदेवांनी क्षमा मागितली. भृगु ऋषींनी त्यांना उ:शाप दिला. त्यामुळे भारतात पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवाचे एकमेव मोठे मंदिर सापडते.
त्यानंतर भृगु ऋषी कैलास पर्वतावर गेले असता शंभू महादेव पार्वतीसह विश्वाच्या संसारावर चर्चा करत असल्यामुळे त्यांचेही भृगूंकडे लक्ष गेले नाही. पुष्कळ वेळ झाल्याने ऋषींना राग आला. स्वतःच्या अपमानामुळे त्यांनी शंकराला शाप दिला " आपल्याला यज्ञाचे सर्वश्रेष्ठ फळ मी देण्यासाठी आलो असतानाही आपण माझ्याकडे दुर्लक्ष केले. या चुकीबद्दल माझा तुम्हाला शाप आहे की आज पासून भूतलावर तुमचीही पूजा कोणीही करणार नाही." शंकरांनी या बद्दल क्षमा मागितल्यावर उःशाप म्हणून त्यांची मूर्ती रुपात नव्हे तर केवळ प्रतीकात्मक रूपात म्हणजेच लिंग स्वरूपात पूजा-अर्चना केली जाईल, असे सांगितले. तेव्हापासून महादेवाच्या शिवलिंगाची (लिंग हा संस्कृत शब्द असून चिन्ह असा त्याचा अर्थ आहे) पूजा होऊ लागली.
शेवटी अपमानाने संतप्त आणि वैतागलेले भृगुऋषी वैकुंठधामाला म्हणजेच श्रीविष्णूच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. तेथे त्यांनी शेषनागावर झोपलेल्या नारायणाला पाहिले. सलग तिसऱ्या ठिकाणीही उपेक्षा वाटेला आल्यामुळे क्रोधाने भडकलेल्या भृगूंनी संतापातच विष्णूच्या छातीवर लत्ताप्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विष्णूची निद्रा भंग पावली. आपल्या छातीवर पाय देऊन उभे असलेल्या ऋषींकडे पाहून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. तात्काळ त्यांनी ऋषींचा पाय आपल्या हातात धरला. "आपल्या कोमल अशा पायांना माझ्या कठोर छातीवरच्या आघाताने केवढे त्रास झाले असतील" असे म्हणून डोळ्यातून अश्रू ढाळीत त्यांचे पाय चोळू लागले. श्री विष्णूचा हा निरागसपणा आणि त्यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यामुळे प्रभावित झालेल्या भृगूंनी शेवटी आपल्या यज्ञाचे फळ विष्णूंना अर्पण करण्याचे ठरवले.
रागाच्या भरात भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवर केलेला लत्ताप्रहार विष्णूंनी भक्ताचे प्रेम समजून मानाने गौरविला. आजही पंढरपूरच्या विठोबाच्या छातीवर श्रीवत्सलांछन आणि तिरुपती बालाजीच्या छातीवर ते पदचिन्ह पाहावयास मिळते.