लेखिका सुधा मूर्ती आपल्या एका व्याख्यानात सांगतात, रामायण महाभारतातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. छोटे छोटे प्रसंग, वाक्य, श्लोक, सुभाषिते जीवनाला मोठा बोध देतात. माझ्या आजोबांनी मला बालपणी महाभारतातला एक श्लोक सांगितला होता, तो मला कायमस्वरूपी लक्षात राहिला. त्या श्लोकाचे सार सांगते-
एकाने अर्जुनाला विचारले की तुझ्याकडे एवढे शौर्य आहे, धनुर्विद्या आहे, राज्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, सुंदर पत्नी आहे, तरी तू त्या द्रोणाचार्य ऋषींना एवढा मान का देतोस? अर्जुनाने एका वाक्यात उत्तर दिले, हे सगळे त्यांच्यामुळेच मला मिळाले आहे म्हणून!
द्रोणाचार्यांकडे सत्ता-संपत्ती नाही, पण त्यांच्याकडे जे बहुमूल्य ज्ञान आहे, ते कोणीही चोरू शकत नाही, मिटवू शकत नाही की हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे असलेले ज्ञान ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या संपत्तीची तुलना प्रापंचिक सुखांशी होणारही नाही. त्या ज्ञानासमोर मी नतमस्तक होतो. कारण भौतिक सुख येईल-जाईल, मात्र ज्ञान हे नेहमीच वर्धिष्णू राहील. म्हणून आपण सर्वानीच गुरूंसमोर नतमस्तक झाले पाहिजे.
अर्जुन द्रोणाचार्य हे गुरु शिष्याचे सुंदर नाते आजच्या पिढीसमोर ठेवायला हवे. आजचे विद्यार्थी शिक्षकांची मस्करी करतात, अपमान करतात, कमी लेखतात, त्यांनी अर्जुनाला आपला आदर्श मानून गुरूंना द्रोणाचार्य मानले पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षण घेऊन ज्ञानाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ज्ञान जितके वाटाल तेवढे वाढते.
म्हणूनच आजच्या तंत्रज्ञान युगातही एक गोष्ट निक्षून सांगावीशी वाटते, की जग कितीही वेगाने पुढे जात असले, ५G चे युग आले, तरी गुरुG ना पर्याय नाही. गुरूंचा आदर करा आणि अर्जुनासारखे शिष्योत्तम होऊन भारताची प्रतिमा जगात उंच करण्यासाठी प्रयत्नशील व्हा!