'अन्य क्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति' असे वचन आहे. अर्थात अन्य ठिकाणी केलेली पापे पुण्यक्षेत्री गेल्यामुळे नष्ट होतात. या वचनानुसार प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याचा (Mahakumbh 2025) विचार केला, तर तिथे जमलेल्या लाखो लोकांचे पाप धुतले जाणे शक्य आहे का? यावर सद्गुरू काय म्हणाले ते पाहू.
सनातन धर्मात तीर्थक्षेत्री केलेले स्नान तीर्थस्नान म्हणून ओळखले जाते. अनेक भाविक श्रद्धेने आजही तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करतात. कुंभमेळ्यात तर त्याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण ग्रहांच्या विशिष्ट योगात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यातही प्रयाग राज येथे भरलेला महाकुंभ १४४ वर्षांनी आला आहे, तिथे त्रिवेणी संगम आहे, अनेक नागा साधू तिथे शाही स्नानासाठी येतात, त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक तिथे कुंभ स्नान करण्यासाठी धडपडतात.
कुंभस्नानाने पाप धुतले जाते का?
मात्र सद्गुरू सांगतात, 'कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर त्यासाठी तुमचे पूर्व कर्म, वर्तमान आणि भविष्यातील कर्म शुद्ध असावे लागते. अन्यथा पापांचे परिमार्जन होणार नाही. याउलट तुम्ही जर सत्कर्म करत राहिलात, तर तुमच्या शरीरावर पडणारे पाणीच नाही तर शरीरात असलेले ७२ टक्के पाणी संगमावरील पाण्यासारखे तीर्थ होईल आणि तुम्हाला पुण्य मिळेल आणि मृत्यूपश्चात मोक्ष मिळेल. त्यामुळे कर्मावर भर द्या, ते योग्य आहे की अयोग्य ते वेळोवेळी तपासून बघा आणि ते सुधारून पावन व्हा!'
कुंभस्नान करावे की नाही?
सद्गुरू सांगतात, तीर्थक्षेत्री जावे, स्नान करावे, अगदी कुंभस्नानदेखील करावे. मात्र त्यामुळे सगळी पापे धुतली गेली आणि आपण नवीन पापे करण्यास तयार झालो असा गैरसमज करून घेऊ नका. तीर्थक्षेत्री गेल्याने मनुष्यात अंतर्बाहय बदल होतात. ती दिव्य अनुभूती घेण्यासाठी कुंभमेळ्यात जा, कुंभस्नान करा मात्र त्याबरोबरीने आपले कर्म स्वच्छ ठेवा आणि सत्कार्य करत राहा, म्हणजे मोक्ष मिळेल.
महाकुंभात सहभागी होता आले नाही तर?
ज्यांना महाकुंभात सहभागी होता आले नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. प्रत्यक्ष तिथे जाता आले नाही, तरीदेखील १४४ वर्षातून एकदा येणाऱ्या महाकुंभाचे आपण दुरून का होईना साक्षीदार आहोत. त्यामुळे अंघोळ करताना पंचनद्यांचे स्मरण करावे, देवाचे स्मरण करावे, आपले कर्म शुद्ध अंत:करणाने आचरावे. ही कृती केवळ पर्वकाळात नाही तर आयुष्यभर करता येणार आहे. विशेषतः शाही स्नानाच्या तारखा दिल्या आहेत, त्यादिवशी आवर्जून हा उपाय करा, पुण्य लाभेल.
शाही स्नानाची तिथी :
१३ जानेवारी : पौष पौर्णिमा १४ जानेवारी : मकर संक्रांति २९ जानेवारी : पौष अमावस्या ०३ फेब्रुवारी : वसंत पंचमी १३ फेब्रुवारी : माघ पौर्णिमा २६ फेब्रुवारी : महाशिवरात्री
प्रयाग राज येथे गेल्यास या दोन मंदिरांना भेट द्या :
महाकुंभात शाही स्नान आणि दान केल्यानंतर बडे हनुमान आणि नाग वसुकीच्या दर्शनाला नक्की जा. शाही स्नानानंतर या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंदिरात गेल्यास महाकुंभाचा धार्मिक प्रवास पूर्ण मानला जातो!