प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सन २०२१ मधील महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे? जाणून घेऊया...
देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते. अनेकांना १६ सोमवरांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
महाशिवरात्री : ११ मार्च २०२१
माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ : ११ मार्च २०२१ रोजी दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे.
माघ वद्य चतुर्दशी समाप्ती : १२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजून २३ मिनिटे.
निशीथकाल : ११ मार्च २०२१ रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून २४ मिनिटे ते ०१ वाजून १३ मिनिटे.
शिव आणि पार्वती विवाह
काही कथांनुसार, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार, या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला ‘जलरात्री’ असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो, असेही म्हटले जाते.