महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. महाशिवरात्रीला शिवपूजनाचे मोठे महत्त्व आहे. शिवपूजनात रुद्राभिषेकाप्रमाणे महादेवांच्या नामस्मरणात महामृत्युंजय मंत्राला अत्याधिक महत्त्व आहे. मात्र, महामृत्युंजय मंत्र पठणाचे काही नियम असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया... (important rules to chant mahamrityunjaya mantra)
ॐ हौं जूं सः। ॐ भूः भुवः स्वः
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।
ॐ स्वः भुवः भूः ॐ। ॐ सः जूं हौं ॐ।
महामृत्युंजयाचा मंत्र प्राणरक्षक आणि महामोक्ष मंत्र म्हणूनही ओळखला जातो. या मंत्रपठणामुळे महादेवांची कायम कृपा राहते, भोलेनाथ प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतात, अशी मान्यता आहे. परंतु, महामृत्युंजय मंत्राचे पठण वा उच्चारण करताना ते नेमकेपणाने करावे, असे सांगितले जाते. महामृत्युंजयाचा मंत्रोच्चार करताना चूक होता कामा नये. आपणास नेमके उच्चारण ठाऊन नसल्यास ते शिकून घ्यावे, असे म्हटले जाते. जाते.
महाशिवरात्रीची विधीवत पूजा कशी करावी, याची सविस्तर माहिती वाचा.
'हे' आहेत महामृत्युंजय मंत्र पठणाचे नियम
सर्वप्रथम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महामृत्युंजय मंत्र नुसत्या जमिनीवर बसून म्हणू नये. शास्त्रानुसार, महामृत्युंजय पठण करण्यासाठी पहाटे २ ते ४ वाजण्याची वेळ ही उत्तम मानण्यात आली आहे. मात्र, ब्रह्ममुहुर्तावर जप करणे शक्य नसल्यास सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यावर करावा. महामृत्युंजय मंत्राची संख्या नेहमी वाढती असावी. ती कमी होता कामा नये.
जपाला बसलाना महादेवाची मूर्ती, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र समोर ठेवावे. मृदु आवाजात शांतपणे जप करावा. स्वच्छ आणि स्पष्ट उच्चारण करावे. अति मोठ्याने करू नये. जप करताना शक्यतो पूर्व दिशेला बसावे. एका जागा निश्चित करून तेथेच बसून जप करावा. मन एकाग्र ठेवावे. केवळ जपाचा विचार करावा. जपावेळी उत्साह, चैतन्यमय वातावरण असावे. आळसात किंवा जांभई देत देत जप करू नये, असे काही नियम सांगितले जातात.