भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना खूप महत्त्व आहे. मराठी वर्षाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. मराठी वर्षातील पवित्र मानल्या गेलेल्या माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थी येते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून साजरी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी महादेवांचे नामस्मरण, पूजन, भजन, अभिषेक करण्याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला महादेवांच्या काही मंत्रांचे पठण केल्यास आपल्याला शिवनाथांच्या विशेष शुभाशिर्वादासह दुप्पट लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते. (Mahashivratri 2022)
सन २०२२ मध्ये ०१ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळाच निशीथकाल असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वांत प्रभावी मानला जातो. महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा, असे सांगितले जाते.
ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।
असा मंत्र म्हणून व्रतपूजनाचा संकल्प करावा. शिवाची मनोभावे षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक करावा. पूजाविधी झाल्यानंतर ।। ॐ नमः शिवाय।। या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. (Lord Shiva Mantra)
शिवाचा गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात।
महादेव शिवशंकराचा गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे. शिवपुराणात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्रीला महादेवाच्या गायत्री मंत्राचे केलेले पठण शुभलाभदायक मानले जाते. या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. मात्र, १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. यामुळे रोगमुक्ती, पापांचा नाश होऊन मानसिक शांतता लाभू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
महामृत्यूंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।
महादेव शिवनाथांचा महामृत्यूंजय मंत्र अतिशय फलदायी असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती या मंत्राचा जप करावा. मात्र, या मंत्राचा जप करताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे मानले जाते. या मंत्राचा जप करण्यापूर्वी महादेवांसमोर तुपाचा दिवा लावावा. जप पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवावा. यासह जप करताना मंत्रोच्चारण सुस्पष्ट असावे, असे काही नियम सांगितले जातात. याशिवाय महादेवांची संबंधित अन्य मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे केलेले पठण शुभफलदायक ठरू शकते. पठण शक्य नसेल, तर मनोभावे त्याचे श्रवण करावे, असे म्हटले जाते.