Maha Shivratri 2024: माघ वद्य चतुर्दशीला म्हणजेच ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. महादेवांच्या विशेष पूजनासाठी महाशिवरात्रीचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक, जलाभिषेक, पूजन केले जाते. लाखो भाविक महादेवांचे नामस्मरण, मंत्र पठण, जप करतात. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. शिवपूजन करताना काही गोष्टींचे व्यवधान पाळणे अत्यंत आवश्यक आहे. शिवपूजन करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते.
महादेवाच्या मंदिरातील प्रदक्षिणा आणि अन्य मंदिरातील प्रदक्षिणा यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. शंकराच्या मंदिरातील प्रदक्षिणा कधीही वर्तुळाकार पूर्ण करावयाची नसते. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी, बाहेर पडणारा मार्ग कधीही ओलांडू नये. शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते. त्यामुळे हे जल लांघणे अनुचित असते. त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष ठेवावे.
बेलपत्राशिवाय कोणताही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये
काही मान्यतांनुसार, कोणतीही गोष्ट शंकराला अर्पण करताना काळजी घ्यावी. बेलपत्राशिवाय कोणताही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये. फूले, नैवेद्य हा शिवलिंगासमोर अर्पण करावा. शिवलिंगावर अर्पण केलेला नेवैद्य ग्रहण केला जात नाही, अशी मान्यता आहे. हा पूजेतील दोष समजला जातो, असे सांगितले जाते.
शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये
महादेवाच्या कोणत्याही मंदिरात अभिषेक करताना वा जल अर्पण करताना काही संकेत पाळावे लागतात. शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये, असे सांगितले जाते. शास्त्राप्रमाणे शंकरावर सकाळच्या प्रहरीच अभिषेक करावा, असे सांगितले जाते. तर, शिवपूजनावेळी चुकूनही शंखाचा वापर करू नये. शंकराने शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो. त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा.
शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा
शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा. मात्र, या अक्षता या निरखून, पारखून घ्याव्यात. भंग पावलेल्या अक्षता पूजनावेळी वापरू नयेत. भंग पावलेला तांदळाचा दाणा हा अपूर्ण आणि अशुद्ध असतो, त्यामुळे त्याचा वापर टाळावा. शिवपूजन करताना केसर, दुपहरिका, मालती, चम्पा, चमेली, जुई या फुलांचा वापर करू नये. याऐवजी बेलाची पाने, भांगाची पाने, धोत्र्याची पाने, घोंगलाची पाने, निळी कमळे, अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वहावीत.