Mahashivratri 2024: ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते. या शिवपूजनात रुद्राभिषेक, जलाभिषेक केला जातो. तसेच बेलपत्राशिवाय शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते. शिवपूजनावेळी जलाभिषेक करताना आणि बेलाचे पान वाहताना काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. तसेच याचे काही फायदेही सांगितले जातात. जाणून घेऊया...
महाशिवरात्रीला आवर्जून व्रताचरण करून विशेष शिवपूजन केले जाते. महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला शिवपूजन केल्याने चौपट अधिक फल मिळते, असे म्हणतात. महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर अभिषेक केला जातो. शिवपिंडीवर कोणत्याही दिवशी अभिषेक करता येतो. मात्र, महाशिवरात्रीला त्याचे महत्त्व कैकपटीने वाढते. महाशिवरात्रीला केलेला अभिषेक अभिषेक खूप फलदायी मानला जातो. अनेक जण रुद्राभिषेकही करतात. महादेवांवर अभिषेक करताना गंगाजल, दूध, जल, पंचामृत आदींचा वापर केला जातो. मात्र, अभिषेक करताना काही नियम पाळावेत, असे सांगितले जाते.
शिवपूजनावेळी जलाभिषेक कसा करावा?
शिवलिंगाला अभिषेक करताना पाण्याचा प्रवाह मंद गतीने असावा. अभिषेक अतिवेगाने करू नये. तसेच जलार्पण करताना पाण्याची धार छोटी असावी. लक्षात ठेवा अभिषेक पूर्वेकडे तोंड करून करावा. जलाभिषेक करताना तो बसून करावा. मंदिरात अभिषेक करताना उभे राहिल्यास थोडे वाकून जलार्पण करावे. शिवपिंडीवर अभिषेक करताना अभिषेक पात्राचा वापर केल्यास उत्तम. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते. तसेच सुख-समृद्धी नांदते आणि दुःखापासून मुक्ती होऊन सगळी संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी मानले जाते. शिवलिंगामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. ज्याचा मनावर सकारात्मक परिणाम होऊन आपले मन शांत होते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करावा. घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते. त्याचप्रमाणे समस्या संकटे दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यास मदत होऊ शकते. ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी केला जाऊ शकतो, असे म्हटले जाते.
बेलपत्र कसे वाहावे?
बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते. अभिषेक केल्यानंतर शंकराला बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्रासोबत भांगाचे पान, धोत्र्याचे पान/फळ याव्यतिरिक्त घोंगलाचे फूल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे. दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहिली जातात, असे सांगतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला तीन पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्र हे तीन पेक्षा कमी किंवा तीन पेक्षा जास्त असू नये. बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच खराब झालेले असू नये. तीन पाने पूर्ण अभंग असावीत, असे सांगितले जाते.
शिवमंदिरात कशी घालावी प्रदक्षिणा?
कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे, तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये, असे सांगितले जाते. शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे. यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणेस सुरुवात करावी. पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथे वाट बंद केलेली असते, तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात. दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य असते, तेथे जात नाहीत. मात्र, असे केल्यास प्रदक्षिणा अपूर्ण राहते. ती पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते.