Mahashivratri 2024: प्रत्येक प्रांतानुसार त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत– काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. शिव उपासनेमागील शास्त्र जाणून घेऊया...
शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते. त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे राहावे, असे सांगितले जाते.
शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा घालण्याचे शास्त्र
कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे, तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये, असे सांगितले जाते. शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे. यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणेस सुरुवात करावी. पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथे वाट बंद केलेली असते, तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात. दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य असते, तेथे जात नाहीत. मात्र, असे केल्यास प्रदक्षिणा अपूर्ण राहते. ती पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते.
शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र
तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो, असे म्हणत शिवाला बेल अर्पण करावे, असे सांगितले जाते. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो, अशी मान्यता आहे. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे.
महाशिवरात्रीचा शिवपूजन विधी
महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते। असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जत नसेल त्यांनी `हे जगत्पतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्प करुन झाल्यावर शंकराचे आवाहन करावे. शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ॐ शिवाय नमः या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी.
‘हे’ अवश्य करा
- दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
- शिवपिंडीला अभिषेक करा.
- अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
- भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
- सर्व मनोकामना पूर्ण होतील.
- कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.
- विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल, असे शिवाचे आशिर्वचन आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
॥ हर हर महादेव ॥