Mahashivratri 2024: ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे आवर्जून दर्शन घेतले जाते.
देशभरातील हजारो शिवमंदिरांमध्ये लाखो भाविक महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून जातात. शिवमंदिरांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोणत्याही मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घातली जाते. ही प्रदक्षिणा एका बाजूने सुरू होऊन गोलाकार पद्धतीने दुसऱ्या बाजूला पूर्ण होते. मात्र, शिवमंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालताना एका विशेष नियम पाळावाच लागतो. त्यामागे काही शास्त्र असल्याचे सांगितले जाते. तसेच काही मान्यता सांगितल्या जातात. नेमका नियम काय? जाणून घ्या...
शिवमंदिरात गेल्यावर प्रदक्षिणेचा ‘हा’ नियम पाळाच
कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे, तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये, असेही सांगितले जाते. शिव निर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तिहीन होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. एका कथेनुसार, पुष्पदंत नावाचा गंधर्व फुले घ्यायला जाताना अजाणतेपणी शिवनिर्माल्य ओलांडून जातो. त्यामुळे त्याची अदृश्य होण्याची शक्ती नाश पावते. शक्तिहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो. त्याने रचलेले काव्य 'शिव महिम्न स्तोत्र' म्हणून ओळखले जाते. या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्याची शक्ती त्याला परत देतात.
शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा
शिवनिर्माल्य ही भगवान शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा आहे. जीवाचा प्रवास हा शेवटी शिवाकडे पोहोचणारा आहे. या प्रवासात आपण आपल्याला आखून दिलेल्या नीती नियमांच्या मर्यादांचे उल्लंघन केले तर एका मर्यादेनंतर मनुष्य शक्तिहीन होणारच. याचे रूपक शिवनिर्माल्य दर्शवते. याबाबत परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी तर्कसुसंगत खुलासा केल्याचे सांगितले जाते. जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवनिर्माल्य समजले जाते, तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे हे शिवनिर्माल्याचे उल्लंघन गणले जाते आणि असले पाप करणारा कितीही शक्तिशाली असला तरीही थोड्याच वेळात शक्तिहीन बनतो. म्हणून वाहिलेले वित्त, प्रभूसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे. अशा कर्माची किंवा मासांची जिथे अवगणना होते त्या समाजात दुष्काळ, मृत्यू, भय यांचे साम्राज्य पसरते, असे शास्त्रवचन आहे. म्हणून शिव निर्माल्य ओलांडू नये, अर्थात देव कार्यात आड जाऊ नये, असे म्हटले जाते.
कशी घालावी प्रदक्षिणा?
शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे. यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणेस सुरुवात करावी. पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य येते, तेथे वाट बंद केलेली असते, तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात. दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य असते, तेथे जात नाहीत. मात्र, असे केल्यास प्रदक्षिणा अपूर्ण राहते. ती पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी, असे सांगितले जाते.