Shree Swami Samarth And Lord Mahadev Shiv Shankar: अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यावर कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. दररोज, नित्यनेमाने स्वामींचे स्मरण, पूजन, मंत्रांचा जप न चुकता केला जातो. आजही स्वामी आपल्यासोबत आहेत, असा अनुभव अनेकांना आला आहे. कोणतीही अडचण, समस्या असली आणि स्वामींना सांगितली की त्यातून मार्ग सापडतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे. ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. स्वामींनी काही भक्तांना महादेव शिवरुपात दर्शन दिले होते, असे सांगितले जाते. याच्या काही कथा सांगितल्या जातात.
काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. स्वामी समर्थ महाराज यांच्या कृतीतून, उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो, असे भक्तगण सांगतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींच्या सोबत असलेल्या भक्तांनी, अनुयायांनी, सेवेकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत. स्वामी समर्थ महाराज हे नेहमी ‘शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो। हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो॥’ हा मंत्र कायम म्हणत असत. स्वामींच्या तोंडी नेहमी शिवाचे नाव असे. शिवाचे स्मरण करायचे. परिस्थिती कोणतीही असो स्वामी समर्थ महाराज शिवाचे या मंत्राचे उच्चारण करायचे, असे सांगितले जाते.
देखिले प्रत्यक्ष शिवरूप
शिव म्हणजे कल्याणकारी. मूळ पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच विश्वाची मूळ शक्ती शिव असल्याने ते देवाधिदेव महादेव आहेत. स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात शिव असल्याची प्रचिती अनेक भक्तांना आली आहे. आनंदनाथ महाराजांना , स्वामीसमर्थांचे शिवरूपात दर्शन झाले म्हणून ते आपल्या अभंगात म्हणतात, “मुख ते देखिले नीजडोळा। गळा मोहनमाळा मध्ये हा रुद्राक्ष। देखिले प्रत्यक्ष शिवरूप॥”
शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन
रायराजे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन काशीला जाऊ असा मनोमन संकल्प केला होता. परंतु रायराजे यांनी केलेल्या संकल्पानुसार ते समर्थांचे दर्शन न घेता काशीक्षेत्री आले. काशीक्षेत्री त्यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींचे अजून एक भक्त श्रीपाद भट हे जेव्हा स्वामी आज्ञेने काशीस गेले तेव्हा त्यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींचे विश्वरूपी दर्शन झाले.
मुंबईचे एक भक्त नंदरामजी ज्यांचा दररोजचा शिवदर्शनाचा नित्यनियम होता, ते एकदा अक्कलकोटला आले. स्वामी तेव्हा मल्लिकार्जुनाच्या देवळाबाहेर बसले होते. स्वामींनी नंदरामजींना सांगितले की, तुमचा शिव आतमध्ये आहे, जा दर्शन घेऊन या. ते मल्लिकार्जुनाचे दर्शन घ्यावयास मंदिरात गेले. आतमध्ये जाताच त्याना शिवलिंग कुठेच दिसेना. तेव्हा ते दचकले. त्याक्षणी त्यांना शिवलिंगाच्या जागी स्वामी दिसू लागले. त्यांचा अहंभाव गळून पडला व ते मंदिराबाहेर येऊन स्वामींच्या पायी येऊन वदले...
आपणचि शिवशंकर। अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर। सर्व लोकांसमक्ष साक्षात्कार। घडला मजलागी॥
आपले सामर्थ्यातिशय अलौकिक। जगदुद्धारार्थ अमानुषीक। अगम्य लीला दावुनी अनेक। विश्वावरी कृपा करिता॥
॥श्री स्वामी समर्थ॥
॥हर हर महादेव॥