महिषासुराला मारण्यासाठी दुर्गेने महिषासुरमर्दिनीचे रूप घेतले. आषाढ शुक्ल अष्टमीला तिने महिषासुराचा वध केला, असे मानून या तिथीला महिषघ्नी व्रत घेण्याची प्रथा आहे. हे व्रत साधे सोपे आहे. मात्र, ते करण्यामागे गहन आशय दडलेला आहे. तो जाणून घेण्याआधी व्रताचे स्वरूप आणि फल पाहुया.
महिषघ्नीव्रत आणि फलित :
या व्रतामध्ये व्रतकर्त्याने हळद घातलेल्या पाण्याने स्नान करावे. नंतर हळद घातलेल्या पाण्यानेच देवीलादेखील स्नान घालावे. मग तिची विधीवत पूजा करावी. कणकेचा शिरा, घारगे, अप्पे यांच्यासारखे पदार्थ नैवेद्यात करावेत. ब्राह्मण तसेच एका ब्राह्मणकुमारीला प्रथम जेवू घालून मग स्वत:ही भोजन करावे. तोपर्यंत उपवास करावा. संध्याकाळी धूप, दीप लावावेत. यामुळे इच्छित वस्तूंचा लाभ होतो, असे या व्रताचे फल सांगितले आहे.
या व्रताचे प्रयोजन काय असावे?
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर या व्रताबद्दल अधिक माहिती देताना लिहीतात-
दुष्ट लोकांचा, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची, त्यांचा बीमोड करण्याची प्रेरणा अशा व्रतांमधून मिळत असते. स्त्री ही अबला नाही. मनात आणले तर ती महाबलाढ्य अशा दुष्टांचा बीमोड करू शकते. हा संदेश महिषासुराच्या या वधकथेतून समाजाला मिळतो. आजच्या काळातही अनेक पातळ्यांवर स्त्रियांना वेळोवेळी ठायी ठायी संघर्ष करावा लागतो. या संघर्षाच्या वेळी आवश्यक असलेले मनोबल देवीपराक्रमाच्या अशा कथा आणि व्रतांमधून मिळत असते. आज हे व्रत अधिक कोणी करताना दिसत नाही. वेळेचा अभाव हे कारण असू शकेल.
काहींना अशी व्रत वैकल्ये कालबाह्य वाटतात, जुनाट वाटतात. जर ही व्रते मनोबलवर्धनाचे कार्य करत असतील तर त्यात थोडाफार बदल करून व्रत करता येईल. या व्रतातही सद्यकालानुसार बदल करायचा असेल तर शौर्य गाजवणाऱ्या स्त्रियांचा, मुलींचा, स्त्रीपोलिस अधिकाऱ्यांचा, सैन्यातील स्त्रियांचा सत्कार आवर्जून करावा. त्यामधून सामाजिक बांधिलकी तर जपली जाईलच. शिवाय अनेक स्त्रियांना त्या त्या क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळेल.