सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये उत्तरायण, पोंगल इत्यादी नावांनी ओळखला जातो. सर्वसाधारणपणे मकर संक्रांती ही १४ जानेवारी रोजी येते. मात्र यावर्षी या सणाच्या तिथीबाबत काहीसा संभ्रम आहे. कुणी १४ जानेवारी रोजी तर कुणी १५ तारखेला मकर संक्रांत असल्याचे सांगत आहे. आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या योग्य तारखेबाबत सांगणार आहोत.
हिंदू पंचांगानुसार १४ जानेवारी रोजी शनिवारी सूर्य रात्री ८ वाजून १४ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे लोकांमध्ये या तारखेबाबत संभ्रम आहे. रात्रीच्या वेळी स्नान, दानधर्म आदी कृत्ये वर्ज्य मानली जातात. त्यामुळे १४ जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे पुढच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी करावी.
१५ जानेवारी रोजी मकर संक्रांती दिवशी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत मक संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. या काळात स्नान, दान-धर्म आदी कार्ये शुभ मानली जातात. मकर संक्रांतीचा दिवस रविवारी येत असल्याने या सणाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. कारण हा वार सूर्य देवाला समर्पित आहे. त्याशिवाय या दिवशी दुपारी १२ वाजून ९ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत अभिजित मुहुर्त असेल. तसेच दुपारी २ वाजून १६ मिनिटांपासून २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत विजयी मुहुर्त असेल.