भारतीय संस्कृतीत सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, परंपरा यांना अनन्य साधारण असे महत्त्व आहे. मराठी वर्षात अनेकविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये अगदी मनापासून आणि श्रद्धेने साजरी केली जातात. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की, पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकरसंक्रांती. संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकरसंक्राती असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती आहे. मकरसंक्रांती म्हटले की, प्रथम आठवतात ते तीळगुळ आणि पतंग उडवणे. आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना धार्मिक, सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व असते. तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते. मकरसंक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते. सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता? जाणून घेऊया... (Sugad Puja On Makar Sankranti 2022)
मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. सन २०२२ मध्ये संक्रमण पुण्यकाल दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटे आहे. मकरसंक्रांतीचा सण देशभरात विविध नावाने आणि पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुघड पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढावी. पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे. काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे. सुगडावर अक्षता, फुले, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर धूप, दीप अर्पण करावे. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.
कोल्हापूरला देवीची संपूर्ण अलंकार पूजा
काही ठिकाणी विशेषत: कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी सुगड दान करण्याची प्रथा आहे. एकमेकांकडे जाऊन याकाळात सवाष्ण महिला वाण लूटतात. कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते. त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले.
सुगड म्हणजे काय?
मकरसंक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते, हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. 'सुघट' या शब्दाचा तो अपभ्रंश होय. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घड. या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते.
गंगास्नानाला विशेष महत्त्व
मकरसंक्रांतीला गंगास्नानाला विशेष महत्त्व असल्याने प्रयागक्षेत्री यात्रा भरते. भारताच्या पूर्व भागात बंगालमध्ये या दिवशी वास्तुदेवता म्हणून बांबूची पूजा केली जाते. भारतभर हा सण वेगवेगळ्या तऱ्हेने पण सारख्याच उत्साहाने साजरा केला जातो. त्याच्या तऱ्हा भिन्न असल्या तरीही उद्देश सुर्याब्द्द्ल कृतज्ञता भाव व्यक्त करणे; तसेच आपापसातील स्नेहभाव वृद्धींगत करणे हाच असतो. या सणाचे विशेष म्हणजे मकरसंक्रांती हा सण एकदोन दिवसांचा नसून तो पुढे माघ शुद्ध सप्तमीपर्यंत म्हणजेच रथसप्तमीपर्यंत दीर्घकाळ चालणारा सण आहे.