पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकडमास असे म्हणतात. तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभकार्ये केली जात नाहीत. तसे असूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ते तीन दिवस म्हणजे- भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत !
दक्षिणेत हे तीन दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला `भोगी पोंगल' असे म्हणतात. त्यादिवशी इंद्रपुजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती ऊतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपतीला खीरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गायीला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तीळगुळाला जसे महत्त्व आहे, तसे दक्षिणेत खीरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो, तर दक्षिणेत मुट्टु पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रात हे तीन दिवस कशाप्रकारे साजरे केले जातात.
भोगी : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला `भोगी' म्हणतात. सबंध भारतात भोगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. या दिवशी अभ्यंगस्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणासाठी मुलीला माहेरी बोलावून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक केले जाते. तसेच तान्ह्या बाळाचे बोरन्हाण केले जाते.
मकर संक्रांती: एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो, त्या प्रवेशकाळाला संक्रांती म्हणतात. हा संक्रांतीकाळ सुक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटले आहे. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात. थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते. तसेच आपापसातले मतभेद विसरून `तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला' असा संदेशही दिला जातो. या काळात सूर्यस्नान घडावे, अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रमही आखला जातो. गुजरातमध्ये पतंगाच्या चढाओढीबरोबर उंधियु पार्टी रंगते.
किंक्रांत : मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस आनंदोत्सवासारखा साजरा केला जातो. तसे असले, तरीदेखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. तसेच काही ठिकाणी प्रवासदेखील टाळला जातो. या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.
असे हे तीन दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात. या मासात आणखीही व्रत वैकल्य केली जातात, जी अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहिती नाहीत. त्यांची माहिती वेळोवेळी करून घेऊया. यंदा मकर संक्रांती एक दिवस पुढे सरकल्यामुळे १४ जानेवारी भोगी, १५ जानेवारी मकरसंक्रांत आणि १६ जानेवारी रोजी किंक्रांत असेल!