>> मकरंद करंदीकर
इंग्रजी नवीन वर्ष सुरु झाले रे झाले की हिंदूंचा पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत ! मकर संक्रांतीला सर्वात महत्वाचा Socio Religious Sport भारतात अस्तित्वात आला आहे तो म्हणजे " पतंगबाजी " ! पतंगाचा इतिहास तसा खूप खूप जुना आहे.
इंडोनेशियातील मुना बेटावरील एका गुहेतील सुमारे १२००० वर्षांपूर्वीच्या चित्रामध्ये पतंग पाहायला मिळतो. चीनमध्ये सुमारे ७००० वर्षांपूर्वी पतंग अस्तित्वात आला. तेथे पतंगाचा वापर दोन ठिकाणांमधील अंतर मोजणे, वाऱ्याची दिशा पाहणे, सैन्याला गुप्त संदेश पाठविणे अशा कामांसाठी केला जाई. रोमनांना वाऱ्याच्या दिशा दाखवणारे फुग्यासारखे लांब पट्टे माहिती होते पण पतंगाविषयीची माहिती मार्को पोलो याने प्रथम युरोपात नेली आणि नंतर बोटीवरील खलाशांनी पतंग नेले. अफगाणिस्तानात गुडीपरन बाजी म्हणून तर पाकिस्तानमध्ये गुडी बाजी ( किंवा पतंगबाजी ) म्हणून हे पतंग उडविणे प्रसिद्ध आहे. या दोन्हीही शब्दांचा, गुढी आणि पतंग या शब्दांशी जवळचा संबंध वाटतो.
भारतात पतंग कधी आला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण देशभरातील पूर्वीच्या अनेक संतकवींच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आणि उल्लेख आढळतात. संत एकनाथ, संत तुकाराम, वैष्णव कवी नानदास यांच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आहे. १२७० ते १३५० या काळातील संत नामदेव यांनी लिहिलेल्या मराठी आणि व्रज भाषेतील काव्यामधील पतंगाचा उल्लेख महत्वाचा आहे. त्यांनी लिहिले आहे -- " आणिले कागद साजीले गुडी,आकाशमंडल छोडी, पाचजनासो बात बाताडवो, चितसो दोरी राखिला ।।" भारतात पतंग या शब्दाचा प्रथम वापर कवी मंझर ( मंझ ) याने १५४२ मध्ये लिहिलेल्या मधुमालती या रचनेमध्ये आढळतो. त्याचे शब्द असे आहेत -- " पांती बांधी पतंग उराई,दियो तोहि ज्यों पियमहं जाई ।।" पतंगाचे उंच आकाशात विहरणे आणि तरीही जमिनीशी धाग्याने बांधलेले असणे, कापला गेल्यास अकाशातच गटांगळ्या खात भरकटत जाणे या गोष्टी साहित्य क्षेत्राला खूपच भावल्या ! त्यामुळे अगदी आजसुद्धा भारतीय भाषांमधील वाङ्मयात, चित्रपटात, कविता, गीते यामध्ये पतंगाची उपमा फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार,पंजाब या राज्यांमध्ये पतंगबाजी खूप प्रसिद्ध आहे. एखादा अपरिहार्य धार्मिक विधी असल्यासारखे मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याचे सामूहिक सोहोळे साजरे होतात.
आपल्या महाराष्ट्राला एका वेगळ्या आणि रांगड्या पतंगाची परंपरा आहे. प्रचलित पतंगासारखा हा नाजूक, देखणा वगैरे नाही तर पेहेलवानासारखा दणकट असतो. तुमच्या शक्ती आणि युक्तिचा कस पाहणारा असतो. याला वावडी म्हणतात. आकाशात या उडविण्याला वावड्या उडविणे असे म्हटले जाते. पण साहित्यामध्ये हा वाक्प्रचार, खोट्या बातम्या पसरविणे, पुड्या सोडणे या अर्थाने तो रूढ झाला. राजकारणामध्ये तर तो आता अत्यंत महत्वाचा शब्द बनून मिरवतो आहे.
महाराष्ट्रामध्ये हे वावड्या उडविणे हे संक्रांतीला न करता श्रावणामध्ये केले जात असे. या काळात जेथे पाऊस कमी आणि वारा खूप असतो अशा गावांमध्ये, अशा ठिकाणांवर हा खेळ खेळला जात असे. आजसुद्धा हा दुर्मिळ खेळ आणि त्याच्या स्पर्धा आवर्जून आयोजित केल्या जातात. ही वावडी पतंगापेक्षा कितीतरी पट मोठी असते. मोठी म्हणजे किती? ६ ते ८ फूट रुंद आणि अगदी २० फूट ऊंच इतका मोठा आकारसुद्धा असू शकतो. वाव याचा अर्थ ४ हात लांबीचे मोजमाप. ही वावडी किमान ४ हात लांब तरी असे आणि ती पतंगाप्रमाणे चौकोनी नसून आयताकृती असे. बांबूची मोठी चौकट तयार करून त्याला साधा जाड कागद लावला जातो. तो हवेमुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे फाटू नये म्हणून कांही ठिकाणी , कापड लावले जाते. , जुन्या साड्या - शेले - मुंडासे यांचे कापड, छोटे झेंडे, झालरी यांनी सजविले जाते. आता प्लॅस्टीक कागद वापरले जातात. झालरीला तोरण, कणीला मंगळसूत्र ( सोबतच्या आकृतीत अ ते अ आणि ब ते ब अशा फुलीप्रमाणे बांधलेल्या दोरीला / कणीला मंगळसूत्र म्हणतात ) असे कांही खास स्थानिक शब्द आहेत. खालच्या बाजूला खूप लांब लांब शेपट्या लावल्या जातात. अलीकडे त्याच्यावर लोकजागृती करणारे, सामाजिक संदेशही लिहिले जातात. ही वावडी आकाशात उडविण्यासाठी नाजूक पातळ मांजा वापरणे शक्यच नाही. यासाठी चक्क सुंभाची जाड दोरी ( रस्सी ) लागते. आता प्लॅस्टिकच्या दोऱ्यासुद्धा वापरल्या जाऊ लागल्या आहेत. दोरीचे बंडल धरण्यासाठी दोन माणसे, उडविण्यासाठी ३ / ४ माणसे लागतात. वावडीने आकाशात झेप घेतल्यावर ती नियंत्रित करायला जमिनीवरील खेळाडूंना शक्ती आणि चातुर्य दोन्ही असावे लागते. वाऱ्याच्या शक्तीवर शिडाची प्रचंड जहाजे चालतात. माणसे हँग ग्लायडिंग करू शकतात. तसेच ही दोरी धरलेली माणसे वाऱ्यामुळे दोरीबरोबर उचलली जातात. यावरून आपल्याला वाऱ्याच्या प्रचंड शक्तीची कल्पना येऊ शकते. यावेळी दोरी जर प्लॅस्टिकची असेल तर ती हातात घट्ट पकडता येत नाही. वावडी साठी लागणारे सर्व साहित्य हे पर्यावरणपूरक असते. आकाशात उडणाऱ्या पक्षांना हे मोठे अडथळे लांबूनही लक्षात आल्याने त्यात अडकून मृत्यू येणे टळते. यामध्ये कापाकापी चालत नसल्याने त्यामुळे संभाव्य अपघात टळतात. वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्यास वावडी अचानक खाली न कोसळता सावकाश खाली उतरविता येते. अनेक ठिकाणी या वावड्यांचे पाण्यामध्ये रितसर विसर्जन केले जाते.
सोलापूरच्या कांही गावांमध्ये या वावड्या उडविल्या जात असत. आजही सोलापूरच्या माळशिरसमधील निमगावमध्ये वावडी महोत्सव साजरा होतो. एकाचवेळी वावड्यांनी व्यापलेले आकाश पाहणे खूप सुखद वाटते. आपली जुनी सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. वावडीचा आकार, ती किती उंची गाठते, कितीवेळ आकाशात राहते या निकषांवर वावड्यांना पारितोषिकेही दिली जातात. महाराष्ट्रात अनेक विविध मोकळ्या ठिकाणी भन्नाट वारा असतो. अशा जागा, पूर्ण वर्षामधील असा कालावधी नक्की करून तेथे वर्षभर वावड्या उडविणे शक्य आहे. एक वेगळा साहसी खेळ म्हणून चालना देणे शक्य आहे. अगदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वावडी महोत्सवसुद्धा आयोजित करता येतील. प्रसिद्धी, प्रायोजक, पर्यटक यांना आकर्षित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. पण त्यासाठी आधी राजकारणातील वावड्या उडविणे थांबायला हवे.
(साभार- अहमदाबादचे पतंग संग्रहालय )