सनातन धर्मात मकर संक्रांत हा केवळ एक सण नसून तो शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. यंदाही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत (Makar Sankranti 2025) आहे. असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवसापासून सर्व शुभ आणि धार्मिक विधी सुरू होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यदेवाचे तेज अधिक वाढते असे म्हणतात. ते तेज आपल्यालाही मिळावे म्हणून मकर संक्रांतीपासून वर्षभर सूर्य पूजा केली जाते तसेच सूर्य नमस्कारदेखील घातले जातात. हा उत्तरायणाचा काळ शुभ मानला जातो. या काळात दान धर्म केल्याने अधिक पुण्य मिळते असे जुने जाणते सांगत असत. हिवाळ्याच्या मौसमात उबदार कपडे देऊन वस्त्रदान केले जाते किंवा तीळगूळ लाडू किंवा कच्चे अन्न दान केले जाते.
मकर संक्रांतीच्या सणाला प्रत्येकाच्या घरी गुळापासून बनवलेले पदार्थ बनवले जातात. गुळपोळी, तीळगुळाचा लाडू, तिळवडी, तीळ शेंगदाणे चिक्की, गुळपापडी, गजक, गुडदाणी असे विविध प्रकार केले जातात, पण यासगळ्यात तीळ-गुळाचा समावेश केला जातो. हिवाळ्यात हे दोन घटक मुख्यत्त्वे वापरण्यामागे कोणते पौराणिक कारण आहे ते जाणून घेऊ
मकर संक्रांतीला तिळगुळाचाच लाडू का?
एकदा सूर्यदेव त्यांच्या मुलाच्या अर्थात शनिदेवाच्या घरी त्यांना भेटायला गेले, तो मुहूर्त होता मकर संस्क्रान्तीचा! शनिदेवाने आपल्या वडिलांचे मोठ्या आदराने स्वागत केले. त्यांनी सूर्यपूजा केली. नात्यात आणि शरीरात स्निग्धता निर्माण करणाऱ्या तीळ आणि गुळाचे दान केले. सूर्यदेवाला ती भेट आवडली. त्यांचे नाते आणखी दृढ झाले. आपल्या पुत्राच्या भक्तीवर सूर्यदेव प्रसन्न झाले. शनिदेवाला आशीर्वाद देताना ते म्हणाले की, जो कोणी तीळ आणि गुळाचे सेवन करून मकर संक्रांतीच्या पवित्र सणाच्या दिवशी माझी पूजा करील, त्याला माझे आशीर्वाद मिळतील! याला जोड देत शनिदेव म्हणाले, अशा भाविकाला माझेही आशीर्वाद लाभतील. कृपा राहील. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ खाण्याची परंपरा सूर्यदेवाच्या आशीर्वादाने सुरू झाली. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यत्त्वे तीळ गूळ लाडू बनवले जातात.
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तीळ गुळाचे महत्त्व :
हिंदू धर्मात गुळ हा शुभ मानला जातो आणि अनेक धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यावरून गुळाचे महत्त्व लक्षात येते. ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतूचे दोष दूर करण्यासाठी गूळ विशेषतः उपयुक्त मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा केतूचा अशुभ प्रभाव असेल तर ती व्यक्ती गुळाचे दान करून या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करू शकते. विशेषत: रविवारी गुळाचे दान केल्यास लाभ होतो. गुळ हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. शनिदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी शनिदेवाच्या मंत्रांच्या जपासह गुळाचे दान करणे किंवा गुळाचे सेवन करणे शुभ सांगितले जाते.