लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : यावर्षी मकर संक्रांत ही १५ जानेवारीला आली. पुढच्या वर्षी मकर संक्रांती १४ जानेवारीला येणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. यानंतर सन २०२५, २०२६,२०२९,२०३०,२०३३,२०३४,२०३७,२०४१,२०४२,२०४५,२०४६ आणि २०४९ यावर्षीही मकर संक्रांतीचा सण हा १४ जानेवारी रोजी येणार आहे.
सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. सन १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने निरयन मकर संक्रांतीचा दिवस पुढे जात जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे. गेल्या वर्षी १५ जानेवारी २०२३ ला होती. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस, ६ तास,९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो.
ग्रेगरीयन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर ते लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो. तसेच दरवर्षींचा ९ मिनिटे १० सेकंद हा काल साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून त्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अशुभ आहे अशी अफवा काही लोक पसरवीत आहेत त्यात काहीही तथ्य नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला काहीही हरकत नाही. उलट थंडीत काळ्या रंगाची वस्त्रे ही शरीर उबदार ठेवतात. म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्राचीन प्रथा असल्याचे पंचांगकर्ते सोमण यांनी सांगितले.